अकोल्यातील राजेंद्र होंडा शोरुम आगीच्या भक्षस्थानी रोकडसह संपूर्ण शोरुम खाक; लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज..

नायक वृत्तसेवा, अकोले
मागील दशकभरापासून अकोलेकरांच्या सेवेत असलेल्या राजेंद्र होंडा या अलिशान दुचाकींच्या दालनाला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत शोरुमचा अंतर्गत भाग पूर्णतः जळून खाक झाला. गल्ल्यातील साडेपाच लाखांची रोकड, जवळपास 20 दुचाक्या, त्यांचे सुटे भाग, टायर, फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, बॅटर्‍यांसह अगदी जमिनीवर अंथरलेले कारपेटही या भयानक आगीत भस्मसात झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍याला आंतून धुराचे लोळ बाहेर पडताना दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. अकोले नगरपंचायतीच्या बंबाने आग आटोक्यात आणली, मात्र तो पर्यंत संपूर्ण शोरुम आगींच्या ज्वाळांमध्ये स्वाहा झाले होते. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


याबाबत अकोले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर रस्त्यावरील राजेंद्र होंडा शोरुममध्ये मंगळवारी (ता.20) पहाटेच्या सुमारास आग लागली. या प्रकरणी शोरुमचे व्यवस्थापक विनोद वाकचौरे (रा.धांदरफळ) यांनी खबर दिली. त्यानुसार अकोल्यातील योगेश देशमुख हा तरुण पहाटे सहाच्या सुमारास शोरुमच्या समोरुन जात असताना त्याला आतून धूराचे लोळ बाहेर पडत असल्याचे दिसले. त्याने शोरुमचे व्यवस्थापक वाकचौरे यांना फोनवरुन कळवल्यानंतर धावपळ सुरु झाली.


अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी तत्काळ अग्नीशमन बंब रवाना केला. मात्र तत्पूर्वी आगीच्या भयानक ज्वाळांनी आपला कार्यभाग पूर्ण केला होता. या भीषण घटनेत शोरुममधील साडेपाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह 20 नवीन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात वाहनांचे सुटे भाग, टायर, शोरुच्या आतील फर्निचरसह लाकडी टेबल, खुर्च्या, सोफा, संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन, बॅटर्‍या, इन्व्हर्टर, ऑईल, पंखे, अंतर्गत दिवे, कागदपत्रे, वाहनांसंबंधी दस्तावेज, फोन व म्युझीक सिस्टिम, लॅपटॉप, 11 सीसीटीव्ही कॅमेरे, रोकड मोजण्याचे मशिन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, हेल्मेट असं जे काही होतं ते सगळं जळून खाक झालं. अकोले नगरपंचायतीच्या बंबाने आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किट होवून लागल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यात 25 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *