नागरिकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे ः आ.काळे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
बहुतांशी नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळणे सोडून तोंडावरचा मास्क देखील काढून टाकल्याने मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. हा चिंतेचा विषय असून नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगावमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार (ता.22) तहसील कार्यालयात आढावा बैठक घेवून मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांना आवाहन करताना आमदार काळे म्हणाले, मागील माहिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. तसेच देशात, राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण देखील सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे कमी होवून जणू कोरोना संपल्याचीच भावना निर्माण झाल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचा विसर पडला होता. त्यामुळे तोंडाला मास्क, सामाजिक अंतर व साबण अथवा हँड सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुण्याचा देखील नागरिकांना विसर पडला होता. या निष्काळजीपणामुळे रोडावलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले. या बैठकीस तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, प्रभारी ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे आदिंसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
