अकस्मात मृत्यु झालेल्या इसमाचा मृतदेह दोन तास रस्त्यावरच! पोलीस, पालिका आणि आरोग्य यंत्रणांना माहिती देवूनही त्यांनी फासला माणूसकीला काळीमा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीणभागातून शहरात आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी रात्री अचानक मृत्यु झाला. त्यानंतर जवळपास दोन तास त्यांचा मृतदेह नाशिक-पुणे महामार्गालगत पडून होता. यावेळी त्या इसमाच्या मदतीला धावलेल्या काही तरुणांनी पोलीस, पालिका आणि आरोग्य अशा जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील सर्वच कार्यालयांची दारे ठोठावली, मात्र कोविडच्या आड लपायला जागा मिळालेल्या या घटकातील कोणाच्याही मनातील माणूसकीला पाझर फुटला नाही. अखेर त्या तरुणांनीच खासगी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो मृतदेह पालिकेच्या शवविच्छेदन गृहात नेवून पोहोचवला. माणूसकीला काळीमा फासणार्‍या यंत्रणेच्या या वागणूकीने शहरातून संताप व्यक्त होत आहे.


काल (ता.1) रात्री साडेनऊच्या सुमारास मद्य प्राशन केलेला एक इसम अचानक खाली कोसळला. हा प्रकार दत्त मंदिरासह आसपासच्या ओट्यावर बसलेल्या अनेक भिक्षेकर्‍यांनी बघितला. मात्र तो इसम दारुच्या नशेत पडला असावा असाच त्यांचा समज झाला, त्यामुळे त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्याचवेळी संंगमनेेरी युुुथ सोशल फाऊंडेशनचे कार्तिक जाधव आणि अन्य दोघे-तिघे तेथून जात असतांना त्यांना सदरचा प्रकार दिसला. त्यांनी सदर इसमाची विचारपूस केली असता भिक्षेकर्‍यांप्रमाणेच अंगात मळकट कपडे असलेला तो इसम मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.


सदर इसमाचा मृतदेह येथून न नेल्यास आसपास मोठ्या संख्येने वावरणारे मोकाट कुत्रे त्यांच्या देहाचे लचके तोडतील या विचाराने त्यांनी सर्वात आधी शहर पोलीस ठाण्याला खबर दिली, मात्र त्यानंतर बराचवेळ पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपत्कालीन स्थितीत वापरल्या जाणार्‍या 108 क्रमांकावर फोन करुन माहिती दिली तेथूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्यांनी पालिकेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनाही फोन करुन रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली, मात्र त्यांनीही त्या कार्यकर्त्यांची बोळवणच केली. ग्रामीण रुग्णालयातील दूरध्वनी तर कोविडच्या गंभीर स्थितीतही बंदच असल्याने त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा मागण्यापूर्वीच फोल ठरली.


यासर्व गोंधळात तब्बल दोन तासांचा कालावधी उलटला, मात्र या काळात ना पोलीस पोहोचले, ना पालिकेचा अथवा आरोग्य विभागाचा कोणी कर्मचारी किंवा रुग्णवाहिका त्यामुळे मानवतेच्या भावनेतून काम करणार्‍या या तरुणांचा हिरमोड झाला. त्याचवेळी त्यातील एकाने मध्यरात्रीच्या सुमारास दैनिक नायकला फोन केला. परिस्थितीचे गांभीर्य आणि कार्यकर्त्यांचे समर्पण पाहुन बांधिलकी जनहिताची असं ब्रीद घेवून संगमनेरकरांच्या सेवेत असलेल्या दैनिक नायकने आपले दायित्त्व ओळखून मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर उपविभागाचे पोलीस अपअधीक्षक रोशन पंडित यांना याबाबत माहिती दिली.


त्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि तब्बल दोनतास बेवारस अवस्थेत रस्त्यावर पडून असलेल्या त्या इसमाचा मृतदेह पाहण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले. मात्र त्यांनीही केवळ सरकारी भूमिका बजावली आणि वरीष्ठांना अहवाल देण्यापूरते मृतदेहाचे दोन-चार छायाचित्र घेवून तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे मृतदेहाची समस्या मात्र कायम राहीली. त्याच सुमारास एकनाथ बारहाते नावाची व्यक्ति तेथून जात असतांना इतक्या रात्री नेमकं काय सुरु आहे हे पाहण्यासाठी ते थांबले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, केवळ रुग्णवाहिका मिळत नसल्याने सदरचा मृतदेह दोन-अडीच तासांपासून येथे पडून आहे.


त्यांच्यातल्याही माणूसकीला पाझर फुटला, आणि ‘माझ्या मालकीच्या चार-पाच रुग्णवाहिका आहेत, असे कधीही घडले तर मला फोन करीत जा’ असं सांगत त्यांनी आपलीच रुग्णवाहिका बोलावली. अखेर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संंगमनेेरी युुुथ सोशल  फाऊंडेशनच्या दोघा-चौघा कार्यकर्त्यांनी त्या अनोळखी इसमाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेला. तेथेही कोणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे त्यांना दिसले. तेथील एका परिचारिकेला याबाबत माहिती देवून मृतदेहाची तपासणी करुन ‘डेथ मेमो’ देण्याची विनंती करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित परिचारिकेने मृतदेह आहे किंवा नाही, जीवंत आहे की मृत याबाबतची कोणतीही खातरजमा न करता चक्क डेथे मेमो लिहून त्या कार्यकर्त्यांच्या हाती सोपवला. हा सगळा प्रकार त्यांच्यासाठी धक्कादायक होता.


मात्र अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी याबाबत वाद घालीत बसण्यापेक्षा त्यांनी माणूसकीला अधिक प्राधान्य देत सदर इसमाचा मृतदेह त्याच रुग्णवाहिकेतून पालिकेच्या शवविच्छेदन गृहात नेला व स्वतःच तो आंत व्यवस्थित ठेवला. आज सकाळी त्यांचे शवविच्छेन करण्यात आल्यानंतर त्यांच्या मुलाच्या हाती तो सोपविण्यात आला. सदरची मृत व्यक्ति तालुक्यातील पिंपळगाव माथा येथील रहिवासी असून त्यांचे नाव अशोक पर्बत पांडे (वय 55) असे आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. घरची शेतीवाडीही आहे, मात्र संबंधित इसमाला दारुचे व्यसन असल्याने ते अधुनमधून संगमनेरात येत असतं. गुरुवारीही संगमनेरात आल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले होते, मात्र घरी परत जाण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध न झाल्याने ते बसस्थानकाच्या परिसरातच थांबले होते. त्याच दरम्यान कोणत्यातरी कारणाने त्यांचा मृत्यु झाला.


सध्या संगमनेर तालुक्यात कोविडचा मोठा प्रादुर्भाव सुरु आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने ग्रामीण रुग्णालयासह शहरात कोविडवर उपचार करणार्‍या सर्वच रुग्णालयांतील खाटा तुडूंब भरल्या आहेत. महामारीच्या या काळात वैद्यकीय आणि त्यातही शासकीय वैद्यकीय यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. कोविडच्या काळात प्रकाशझोतात आलेली ही यंत्रणा सध्या मात्र अजगर झाल्याचाच अनुभव गुरुवारच्या घटनेतून अनुभवायला मिळाला. चक्क माणूस मरुन पडलेला असतांना आणि त्याबाबत माहिती मिळालेली असतांनाही यंत्रणेतील कोणत्याही घटकाच्या मनातील माणूसकीला पीळ पडला नाही. त्यावरुन कोविडच्या रुग्णांचे काय होत असेल हे वेगळे सांगायला नको अशीच शंका यातून निर्माण झाली आहे. मात्र संगमनेरात सबकुछ अलबेल असल्याचे चित्र निर्माण केले गेल्याने सद्यस्थितीत तरी संगमनेरकर ‘रामभरोसे’ असल्याचेच गुरुवारच्या घटनेने दाखवून दिले आहे.


अपघाती अथवा अकस्मात मृत्यु झालेल्या व्यक्तिचा मृतदेह सुरुवातीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात न्यावा लागतो. तेथे रात्रपाळीचे वैद्यकीय अधिकारी मृतदेहाची तपासणी करुन ती व्यक्ति मृत झाली आहे किंवा नाही याची शहनिशा करतात व त्यानंतरच डेथमेमो देण्याचा नियम आहे. ग्रामीण रुग्णालयात मात्र या नियमांना कोविडच्या आडून हरताळ फसण्यात आल्याचेच गुरुवारी अनुभवायला मिळाले. तेथे रात्रपाळीला उपस्थित असलेली परिचारिकाच वैद्यकीय अधिकारी असते व त्यांच्याकडे कोणीही मृतदेह घेवून गेल्यास तो जीवंत आहे की मृत याची कोणतीही खातरजमा न करता थेट डेथ मेमो हाती सोपवला जातो. असं का? हा प्रश्‍न विचारल्यावर ‘हे असंच आहे’ असं उद्धट उत्तरही मिळतं. यासर्व प्रकारावरुन घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात सबकुछ अलबेल असल्याचा फक्त अभासच आहे असं म्हणण्यास मोठा वाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Visits: 121 Today: 1 Total: 1418026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *