राज्यस्तरीय योगासन स्पर्धा होणार ‘ऑनलाईन’! राज्यातील सातशेहून अधिक खेळांडूंचा सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खेल मंत्रालयाची मान्यता प्राप्त झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनने राष्ट्रीय योगासन स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यानुसार फेडरेशनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने राज्यात 22 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या असून राज्यातील सातशेहून अधिक स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदविला आहे. देशातील कोणत्याही क्रीडा प्रकारात ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदाच इतक्या व्यापक प्रमाणातील या स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

गेल्या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकारच्या खेल मंत्रालयाने योगासनांना राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिली. योगासनांच्या प्रचार व प्रसारासाठी योगमहर्षी स्वामी रामदेव यांच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनची स्थापनाही करण्यात आली. योगासनांना राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर संगमनेरात रेफरी (पंच) प्रशिक्षणाचा तीन दिवसांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यातून तीन हजारांहून अधिक योगासन प्रशिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर देशभरात राज्यनिहाय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यात महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान या स्पर्धा होत आहेत.

या स्पर्धेत 22 व 23 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ फेरी, 27 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत उपांत्यपूर्व सामने, 11 व 12 मार्च रोजी उपांत्य सामने व 14 मार्च रोजी अंतिम सामने होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने इतक्या व्यापक प्रमाणात प्रमाणात बहुधा पहिल्यांदाच होणार्‍या या स्पर्धेसाठी राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बापू पडाळकर, सचिव डॉ.संजय मालपाणी व संयोजक सतीश मोहगावकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी उत्तम नियोजन केले आहे.

Visits: 165 Today: 2 Total: 1579783

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *