देवगड फाट्याजवळ कार व खासगी बसच्या अपघातात पाच ठार मृत सर्वजण जालना जिल्ह्यातील रहिवाशी; शिर्डीहून घरी परतताना घडला अपघात

नायक वृत्तसेवा, नेवासा
नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार झाले. हा अपघात आज (सोमवार ता.22) पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील मृत जालना जिल्ह्यातील आहेत.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास अपघातातील मयत मित्र हे शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन नेवासा मार्गे औरंगाबादकडे जात असताना त्यांची स्वीफ्ट कारने (क्रमांक एमएच.21, बीएफ.7178) महामार्गावरील दुभाजक पार करुन देवगड फाट्याजवळ औरंगाबादहून अहमदनगरकडे येणार्‍या खासगी ट्रॅव्हल बसला (एमएच.19, वाय.7123) धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील शंतनू नायबराव काकडे (वय 22, रा.जयपूर, ता.मंठा, जि.जालना), कैलास विठ्ठल नेवरे (वय 23), रमेश दशरथ घुगे (वय 22), विष्णू उद्धवराव चव्हाण (वय 22, तिघे रा.मेसखेडा, ता.मंठा, जि. जालना), नारायण दिगंबर वरकड (वय 24, रा.लाळतोंडी, ता.मंठा) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती.

या अपघाताची माहिती समजताच नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आपले सहकारी पोलीस कर्मचारी अशोक नागरगोजे, बबन तमनर, दिलीप कुर्‍हाडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी आसल्याने सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अपघातस्थळी जावून पाहणी केली आहे. सर्व मृतदेह उत्तरीण तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केली आहेत. कारचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने किंवा अन्य कारणाने हा अपघात झाला, हे तपासाशिवाय सांगता येणार नाही.
– विजय करे (पोलीस निरीक्षक, नेवासा)

Visits: 134 Today: 1 Total: 1115183

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *