संगमनेर तालुक्यातील सदतीस ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान! ओझर खुर्दमध्ये सर्वाधिक तर घुलेवाडीत सर्वात कमी टक्केवारी; मंगळवारी दोन वाजेपर्यंत लागणार सर्व निकाल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील साडेसात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसह संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या 294 सदस्यांसह 35 सरपंच निवडीसाठी रविवारी उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. अपवादात्मक वादावादी वगळता तालुक्यातील 158 मतदान केंद्रातून कोणतेही अप्रिय वृत्त हाती आले नाही. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत घेण्यात आलेल्या मतदानात तालुक्यातील ओझर खुर्द येथे सर्वाधिक 92.3 टक्के तर सर्वात मोठ्या आणि श्रीमंत समजल्या जाणार्या घुलेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वात कमी 60.7 टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून नऊ फेर्यांमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी सदस्य व सरपंचाच्या निवडी बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. त्यात सायखिंडी व डोळासणे येथील सरपंचपदाच्या निवडी बिनविरोध होण्यासह तालुक्यातील एकूण 73 सदस्यपदांच्या जागाही बिनविरोध झाल्या. मात्र उर्वरीत 35 सरपंचांसह 294 सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी त्यासाठी योग्य नियोजन केल्याने आजी-माजी महसूल मंत्र्यांचा प्रभाव असलेल्या व संवेदनशील समजल्या जाणार्या चौदा ग्रामपंचायतींसह तालुक्यातील सर्व ठिकाणी उत्साहात आणि शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये 98 हजार 3 मतदारांचा समावेश होता. त्यातील 78 हजार 901 जणांनी (80.5 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीत सर्वाधिक 92.3 टक्के मतदान ओझर खुर्दच्या ग्रामपंचायतीसाठी झाले. त्या खालोखाल हंगेवाडी 91.4 टक्के, रहिमपूर 90.1 टक्के, वडझरी खुर्द 89.6 टक्के, खराडी 89.1 टक्के, सादतपूर 88.7 टक्के, दरेवाडी 88 टक्के, वाघापूर 87.8 टक्के, मालुंजे 87.7 टक्के, धांदरफळ खुर्द 87.6 टक्के, निंबाळे 86.8 टक्के, आंभोरे 86.8 टक्के, वडझरी बु. 86.6 टक्के, रणखांबवाडी 86.5 टक्के, चिकणी 86.4 टक्के, जांभुळवाडी 86.3 टक्के, पोखरी हवेली 86.2 टक्के, निमगाव भोजापूर 86 टक्के, कोल्हेवाडी 85.3 टक्के, जोर्वे 84.8 टक्के, तळेगाव दिघे 84.2 टक्के, करुले 84.2 टक्के, जांबुत बु. 84.1 टक्के, कणकापूर 82.8 टक्के, धांदारफळ बु. 82.7 टक्के, निळवंडे 81.6 टक्के, कर्जुले पठार 81.4 टक्के, साकुर 81.3 टक्के, उंबरी बाळापूर 81.1 टक्के, पिंपरणे 80.3 टक्के, निमगाव जाळी 80.1 टक्के, चिंचोली गुरव 80.1 टक्के, कोळवाडे 79.2 टक्के, निमोण 79.1 टक्के, सायखिंडी 74.8 टक्के, डोळासणे 74.3 टक्के व तालुक्यातील सर्वात श्रीमंत व मोठ्या समजल्या जाणाऱ्या व 14 हजार 130 मतदार असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीसाठी अवघ्या 8 हजार 579 मतदारांनी आपला हक्क बजावताना 60.7 टक्के मतदान केले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मिळून एकूण 80.5 टक्के मतदान झाले आहे.
उद्या मंगळवारी (ता.20) सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी 20 टेबलच्या माध्यमातून एकूण नऊ फेर्यांमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच्या सर्व निकाल जाहीर होणार आहेत. त्यात सर्वप्रथम सकाळी 10 वाजता वाघापूर, खराडी चिंचोली गुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी व सायखिंडी या ग्रामपंचायतीचे निकाल पहिल्याच फेरीत जाहीर केले जाणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता जांबुत बु., कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे व कोल्हेवाडी ग्रामपंचायतीचे निकाल दुसर्या फेरीत जाहीर होतील.
सकाळी 11 वाजता तिसरी फेरी सुरु होईल व त्यातून आंभोरे, कोळवाडे, निंबाळे, जोर्वे व मालुंजे या ग्रामपंचायतींचे निकाल समोर येतील. चौथी फेरी सकाळी साडेअकरा वाजता सुरु होईल त्यात वडझरी बु., निमोण, वडझरी खुर्द, करुले व निळवंडे ग्रामपंचायतीचां समावेश असेल. पाचवी फेरी दुपारी बारा वाजता सुरु होईल. त्यातून हंगेवाडी, कणकापूर, ओझर खुर्द, सादतपूर, रहिमपूर व उंबरी बाळापूर येथील निकाल समोर येतील. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आजी व माजी महसूल मंत्र्यांच्या पॅनल एकमेकांसमोर उभे होते. सहावी फेरी दुपारी साडेबारा सुरु होईल व त्यातून निमगाव जाळी, चिकणी, धांदरफळ खुर्द व धांदरफळ बु. ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होतील.
सातवी फेरी दुपारी एक वाजता होईल. त्यात तळेगाव दिघे व साकुर या दोन मोठ्या ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर केले जातील. आठव्या फेरीत दुपारी दीड वाजता निमगाव भोजापूरसह घुलेवाडीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर नवव्या आणि शेवटच्या फेरीत दुपारी दोन वाजता पोखरी हवेली येथील ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांसह सरपंचपदासाठी झालेल्या मतदानाचा निकाल घोषीत केला जाईल. ही मतमोजणी प्रक्रिया संगमनेर नगरपालिकेच्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडणार आहे. त्यासाठी हा रस्ता सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून परवानगीशिवाय कोणालाही या परिसरात जाता येणार नाही.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या मतदानाची मोजणी करण्यासाठी दीडशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्याशिवाय चोख पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या वेळेच्या अर्धातास आधी मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर उपस्थित राहावे. उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांकडून मतमोजणी परिसरात घोषणाबाजी अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल घोषीत करण्याचा प्रयत्न आहे.
– अमोल निकम
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, संगमनेर