संगमनेरातील महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबाडले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अंगणात रांगोळी काढणार्‍या महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.19) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली आहे. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नवीन नगर रस्ता संगमनेर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. येथील अभिनव नगरमध्ये अरूंधती विजय रेघे यांचे घर आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या रेघे या सकाळी सव्वा सातच्या सुमारासअंगणात रांगोळी काढत होत्या. रांगोळी काढून झाल्यानंतर त्या घरात जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडत त्यांना जोराचा धक्का दिला. त्यानंतर हे चोरटे नवीन नगर रस्त्याकडे गेले. काही क्षणात हा प्रकार घडल्याने रेघे गोंधळून गेल्या. त्यांच्या मानेला जखम झाली आहे. रेघे यांची मुलगी अ‍ॅड.मृदुला बंदिष्टे यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना घडला प्रकार भ्रमणध्वनीद्वारे कळविला. त्यानंतर देशमुख यांनी तत्काळ अभिनव नगरला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Visits: 251 Today: 1 Total: 1871023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *