स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचा ‘स्वबळाचा’ नारा! संपर्कप्रमुख बबन घोलप; साखरसम्राटांची दावणी सोडा अन्यथा मीच सोडतो

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी लोकसभा मतदारसंघाने नेहमीच निष्ठावान शिवसैनिकाला साथ दिली आहे. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेशी गद्दारी करणार्यांना कधीही यश मिळालेले नाही. शिंदे गटात सामील झालेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांचा फैसला शिवसैनिकच करतील, आपण संपर्कप्रमुख म्हणून तळागाळात पक्ष पोहोचवण्याचे काम करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असून साखरसम्राटांच्या जिल्ह्यातील मतदार शिवसेनेलाच कौल देतील. कोणी त्यांच्या दाखवणीला गेला असेल तर ती सोडा, नाहीतर मीच सोडवेल असा गर्भीत इशारा माजीमंत्री व शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी मंगळवारी शिर्डीतून दिला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर मंगळवारी (ता.2) ते शिर्डीत आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व राजेंद्र झावरे, राजेंद्र पठारे, राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे, साईबाबा विश्वस्त संस्थेचे सदस्य सचिन कोते, कमलाकर कोते, संगमनेरचे शहरप्रमुख अमर कतारी, सुहास वहाडणे, प्रमोद लबडे, भरत मोरे, सागर लुटे, विजय काळे, भागवत लांडगे, मुकुंद सिनगर, सुनील परदेशी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना बबन घोलप म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिकाची निष्ठा मातोश्रीशी आहे, यापूर्वीही पक्षाने बंडखोरीचा अनुभव घेतला आहे. मात्र प्रत्येकवेळी पक्षाशी गद्दारी करणार्यांना मतदारांनी धडा शिकवला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात पक्षाशी गद्दारी होण्याचा आजचा पहिला प्रसंग नसून 2014 साली तत्कालीन खासदारांनी असाच प्रकार केला होता, त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राने पाहीले असून शिंदे गटात सामील झालेल्या खासदार सदाशिव लोखंडेंना योग्य उत्तर देण्यासाठी शिवसैनिक सक्षम असून आपण पक्षाने सोपविलेली संपर्कप्रमुखाची जबाबदारी सांभाळताना पक्षाला तळागाळातील घटकापर्यंत नेण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिक निष्ठावान असून पक्षातंर्गत गटातटाचे राजकारण आता यापुढे राहणार नाही. या मतदारसंघाने नेहमीच निष्ठावान शिवसैनिकाला साथ दिली असून येथे गद्दारीला स्थान नाही. साखरसम्राटांचा जिल्हा असूनही आता जिल्ह्यातील मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभा राहीला असून यावेळी मतपेटीतून ते पहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच घोलप यांनी शिवसेनेत राहून प्रस्थापितांशी सलगी करणार्यांवरही आसूड ओढले. कोणी साखरसम्राटांच्या दावणीला बांधलेला असेल तर त्याने आपलं दावं सोडवून घ्यावं, नाहीतर आपणच ते सोडवू असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.

आगामी कालावधीत होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना स्वबळावरच लढविणार असून कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी या बैठकीतून पदाधिकार्यांना दिले. यावेळी काही शिवसैनिकांनी लोकसभेची उमेदवारी करणार आहात का? असा सवाल विचारताच ते म्हणाले की, तिकीट कोणाला द्यायचे याचा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यांनी निश्चित केलेल्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचे काम कार्यकर्त्यांचे असते. आपलं काम पक्षाचा विस्तार करणं, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आहे त्यासाठीच आपण आल्याचे ते म्हणाले.

लोकसभेच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य करताना बबन घोलप म्हणाले की, मी असेल किंवा नसेलही, पण जो कोणी असेल तो घोलपच असेल असे समजून आजपासूनच तयारीला लागा. शिर्डीतील गद्दारी येथील शिवसैनिकाने कधीही खपवून घेतलेली नाही, आजही तशीच परिस्थिती निर्माण झालेली असल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सर्वत्र शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी झपाटून काम करण्याची गरज आहे. कोणी काम करीत नसेल, विरोधकांच्या फायद्याचे गणित मांडीत असेल तर अशांना बदलण्याची वेळ आता आली असून आवश्यक असतील तेथे बदल करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठनेते शरद पवार यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीने एकत्रित लढविल्यास त्याचा फायदा होईल असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेथे आवश्यकता असेल तेथे काँग्रेस व राष्ट्रवादीशी जुळवून घ्या अशी सूचना शिवसैनिकांना केली होती. त्यामुळे राज्यातील आगमी निवडणुकांमध्ये मविआचेच प्रतिबिंब दिसेल असे आडाखे बांधले जात असताना शिर्डीत पदाधिकार्यांशी बोलताना संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी मात्र स्वबळाचा नारा दिल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. घोलप यांनी केलेले वक्तव्य वस्तुनिष्ठ आहे की विरोधकांच्या मनात कालवाकालव करणारे हे येणार्या काळात स्पष्ट होणारच आहे.
