अकोलेतील महावितरण कार्यालयात माजी आमदारांचा ठिय्या वीजबिलांची सक्ती न करता रोहित्रेही बंद न करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकर्‍यांवर दुहेरी संकट असताना वीज तोडणी सुरू केली, ही बाब थेट शेतकरी विरोधी असून वीज वितरण कंपनीने वीजबिल भरण्याची सक्ती न करता विद्युत रोहित्रे बंद करु नये. या मागणीसाठी भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी महावितरण कार्यालयात शुक्रवारी (ता.19) ठिय्या आंदोलन केले.

अकोले येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात उपअभियंता ज्ञानेश्वर बागुल यांच्या कार्यालयात माजी आमदार वैभव पिचड यांचे समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते गिराजाजी जाधव, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, दूध संघाचे संचालक गोरख मालुंजकर, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, शहराध्यक्ष सचिन शेटे, शंभू नेहे, राजेंद्र गोडसे, अमोल येवले, जनार्दन मोरे आदी उपस्थित होते.

सर्वत्र बाजारपेठा बंद असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीही मंदावल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत महावितरणने कृषीपंपाच्या थकीत बिलांसाठी रोहित्र बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतल्याने तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे वीज बिले भरण्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी काही शेतकर्‍यांवर सावकाराच्या दारात जाण्याची व उसणवार करण्याची वेळ ओढवली आहे.

खरीप पिके अतिवृष्टीने हातातून गेल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत आहेत, यातून सावरत शेतकर्‍यांनी मोठ्या हिंमतीने रब्बीतील गहू, कांदा, भाजीपाला व चारा पिके घेतली आहेत. यातील बहुतांशी पिकांना सध्या शेवटच्या पाण्याची गरज आहे. मात्र अगोदरच महावितरणच्या भारनियमनामुळे पाणी असून शेती करणे अवघड झाले असताना आता तर महावितरण कंपनीने थकीत वीजबिलांची वसुली सुरू केली आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची रोहित्रे बंद केली जात आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. जर महावितरणने ही मोहीम चालू ठेवली तर शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके हातातून जाणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत.

प्रवरा, आढळा, मुळा नदी परिसतील क्षेत्रातील बागायती क्षेत्राला याचा मोठा झटका बसत आहे. यासाठी राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलने करण्यात आली. तालुक्यात माजी आमदार वैभव पिचड यांनीही महावितरणवर मोर्चा काढून संबंधित अधिकार्‍यांना यासंदर्भात जाब विचारला. मात्र तालुक्यातील विद्यमान आमदार याबाबत एकही शब्द बोलायला तयार नाहीत. दरम्यान महावितरणने शेतकर्‍यांच्या आर्थिक अवस्था व सध्याचे शेतमालाचे भाव पाहता थकीत वीजबिल वसुलीसाठी सुरू केलेली वीज तोडणी, रोहित्र बंद करणे मोहीम तत्काळ थांबवावी. दोन दिवसांत जी रोहित्रे बंद केली आहेत ती जोडून द्यावी, वीज वितरणच्या तारांमुळे ऊस पेटण्याचे प्रकार होत असून त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे तातडीने या तारांची दुरुस्ती करावी अशा मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पिचड यांनी दिला आहे.

Visits: 90 Today: 1 Total: 1107024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *