वीजबिल वसुलीच्या प्रश्नावर भारतीय जनसंसद संघटना मैदानात राहुरीतील ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सोमवारी करणार आंदोलन

नायक वृत्तसेवा, राहुरी
वीजबिल वसुलीच्या प्रश्नावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भारतीय जनसंसद ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. शेतकर्‍यांकडून कृषी पंपाची सक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासाठी सोमवारी (ता.22) कृषी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. दरम्यान, आपण पोलीस बंदोबस्तात वसुली करणार असल्याचे बोललोच नव्हतो. भाजपने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून बदनामी सुरू केल्याचे स्पष्टीकरण तनपुरे यांनी दिले आहे.
टाळेबंदीच्या काळातील वीजबिले, त्यांची थकबाकी आणि सुरू असलेली वसुली हे मुद्दे सध्या चर्चेत आहेत. वाढीव बिले भरण्यास विरोध होत असून वसुलीसाठी वीज कंपनीकडून विविध उपाय सुरू आहेत. कृषीपंपांची वीजबिल वसुली करण्यासाठी काही ठिकाणी रोहित्रे बंद केल्याच्याही तक्रारी येत आहेत. घरगुती वीजबिल वसुलीसोबतच कृषीपंपांच्या वीजबिल वसुलीचा प्रश्नही सध्या पेटत आहे.

या पार्श्वभूमीवर हजारे प्रणित भारतीय जनसंसद या संघटनेने आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख अशोक सब्बन यांनी दिली. सोमवारी 22 फेब्रुवारीला ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या राहुरीतील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वत: हजारे यामध्ये सहभागी होणार नसले तरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. सक्तीने होणारी कृषीपंपांची वीजबिल वसुली थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या एका वक्त्यव्यामुळे वातावरण पेटले आहे. मात्र, स्वत: तनपुरे यांनीच आता आपण असे बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे. अहमदनगर शहरातील तेलीखुंट वीज कार्यालयातील कर्मचार्‍यावर एका गुंडाने हल्ला केला होता. त्यावेळी तनपुरे तेथे आले होते. वीजबिल वसुलीसाठी गेल्यावरही असे हल्ले होतात, त्यामुळे पोलीस संरक्षण देणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना केला होता. त्यावर यासंबंधी आपण पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे तनपुरे म्हणाले होते. यासंबंधी स्पष्टीकरण देताना तनुपरे यांनी आता सांगितले की, हल्ला झालेल्या कर्मचार्‍यांना धीर देण्याची आपली भूमिका होती. कृषीपंपांचे वीजबिल वसुलीसाठी पोलीस कारवाई करण्याचा कोणताही विचार नाही. शेतकर्‍यांना त्रास होईल, असे निर्णय घेतले जाणार नाहीत. भाजपने माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियात बदनामी सुरू केल्याचा आरोपही तनपुरे यांनी केला.

Visits: 4 Today: 1 Total: 27319

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *