प्रजासत्ताक दिनी पेटवून घेतलेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू! पोलिसांनी भाडेकर्याला घराबाहेर काढण्याच्या मागणीसाठी घेतले होते पेटवून

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाडेकर्याशी फसलेल्या आर्थिक व्यवहारात पोलिसांनी हस्तक्षेप करुन आपले घर खाली करुन द्यावे अशा बेकायदा मागणीसाठी आत्मदहन करणार्या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला. प्राजासत्ताक दिनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांनी स्वतःला पेटवून घेतले होते. या घटनेत त्यांच्या शरीराचा जवळपास साठ टक्के भाग जळाल्याने त्यांना सुरुवातीला खासगी व नंतर लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आणि गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने खांडगाव शिवारातील गणेशवाडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सादिक शेख व त्याची पत्नी सुमैय्या हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून अनिल शिवाजी कदम (वय 73) यांच्या गणेशवाडी येथील घरात भाड्याने राहतात. या दरम्यान सदरची जागा खरेदी करण्याबाबत दोघांमध्ये सहमतीचा व्यवहार होवून त्यातून शेख यांनी काही रक्कम देत कदम यांच्याकडून साठेखत (विसार पावती) करुन घेतली होती. मात्र त्यानंतर संबंधित दाम्पत्य व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने कदम यांनी न्यायालयाचे दरवाजे गाठले होते, सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणाबाबत न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणतीही कारवाई करता येत नाही. असे असतानाही गेल्या तीन वर्षांपासून अनिल कदम हे दरवर्षी स्वातंत्र्य दिन अथवा प्रजासत्ताक दिनी पोलिसांना अर्ज देवून या प्रकरणात हस्तक्षेप करावा अन्यथा आत्मदहन करु असा इशारा देत होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांनी असाच अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना अटक करुन गजाआड केले व जामीनासाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडले होते. गेल्या यावर्षीचा अनुभव लक्षात घेवून कदम यांनी यावेळी 10 जानेवारीच पोलिसांना अर्ज देत माझ्या घरातील भाडेकरी खाली करुन द्या, अन्यथा 26 जानेवारी रोजी आपण आत्मदहन करु असा इशारा दिला.
प्रजासत्ताक दिनाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी गेल्या 20 जानेवारीपासून त्यांचा शोध सुरु केला. मात्र कदम ना घरी परतले, ना त्यांच्या नातेवाईकांकडे त्यामुळे पोलीस हतबल झाले होते. प्रजासत्ताक दिनी सर्वकाही अलबेल आहे असे वाटत असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून स्वतःला पेटवून घेतले. ही गोष्ट लक्षात येताच शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू गायकवाड व रावसाहेब कदम यांनी धाव घेत त्या वृद्धाला आगीपासून वेगळे केले व तातडीने नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र संबंधित वृद्ध साठ टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर तेथेच उपचार सुरु होते. मात्र काल (ता.28) सायंकाळच्या सुमारास मृत्यूशी सुरू असलेला त्यांचा संघर्ष तोकडा पडला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशीराने गणेशवाडी परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल शिवाजी कदम (वय 73) यांनी यापूर्वी अशाच पद्धतीने तब्बल तीनवेळा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वेळी शहर पोलिसांनी त्यांना अटक करुन थेट गजाआड टाकले होते. तेथून सुटका करण्यासाठी त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. यावेळीही पोलिसांनी तशीच योजना आखली होती, मात्र पूर्वानुभव असलेले कदम 20 जानेवारीपासून भूमिगत झाल्याने पोलिसांना ते कोठेही आढळून आले नाही. शेवटी त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे 26 जानेवारी रोजी त्यांनी स्वतःला पेटवून घेतले आणि अखेर त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत त्यांचा बळी गेल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
