महसूल मंत्र्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे गटनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यात ‘स्फूर्ती दिना’चे आयोजन केले होते. यानिमित्त तालुक्यातील 171 गावांमध्ये महिलांच्या सहभागातून झालेली रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, तिळगूळ वाटप, हळदी-कुंकू समारंभाला उदंड प्रतिसाद मिळाला असून मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धा व वृक्षारोपण आदी उपक्रमांसह वाढदिवस भरगच्च कार्यक्रमांनी साजरा झाला.
7 फेब्रुवारीला अमृत उद्योग समूहाच्यावतीने व विविध सेवाभावी संस्थांच्यावतीने स्फूर्ती दिनाचे औचित्य साधून गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयू देशमुख व डॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी-वस्तीवर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची यांसह गप्पागोष्टी, हळदी-कुंकवाचे कार्यक्रम झाले. यास महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. महिलांच्या विकासासाठी आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन तपासणी हे उपक्रमही लक्षवेधी ठरले. याच बरोबर तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा, मॅरेथॉन, संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, फळे वाटप, दिव्यांगांना मदत असे सामाजिक उपक्रमही तालुक्यात गावोगावी साजरे झाले.
नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सुनंदा जोर्वेकर, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे यांसह महिला पदाधिकार्यांनी विविध गावांना भेटी देत महिलांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. याचबरोबर तरुणांसाठी आयोजित झालेली मॅरेथॉन स्पर्धा व राजवर्धन युथ फाउंडेशनच्यावतीने आयोजित नामदार चषक हे आकर्षणाचा विषय ठरला. यामध्ये हजारो तरुणांनी सहभाग घेतला. तर थोरात कारखान्यावर अनुराधा नागवडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याचबरोबर तळेगाव भागामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन झाले. याशिवाय जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून निबंध स्पर्धा व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले. स्फूर्ती दिन व काँग्रेस बळकटीकरण सप्ताहनिमित्त संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची झलक व अभिमान तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या चेहर्यावर दिसत होता.