‘महाधन’ कंपनीच्या खतांची नक्कल करुन संगमनेरात विक्री! कंपनी आणि शेतकर्यांची फसवणूक; रोहिणी कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतीसाठी लागणारी बियाणे व औषधांच्या नामचीन कंपन्यांची हुबेहुब नक्कल करुन त्याची विक्री करण्याचे प्रकार सर्रास घडत असतांना आता त्यात खतांचाही समावेश झाला आहे. या प्रकरणी ‘महाधन’ कंपनीच्या विक्री व्यवस्थापकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रोहिणी कृषी सेवा केंद्राचे संचालक सीताराम मारुती गुंजाळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित कृषी सेवा केंद्राद्वारे तालुक्यातील किती शेतकर्यांची फसवणूक झाली व तालुक्यात आणखी कोठे अशा प्रकारच्या खतांची विक्री होते याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खत निर्मितीच्या क्षेत्रात देशात अग्रणी असलेल्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड या कंपनीच्या ‘महाधन’ या मोठ्या प्रमाणात विक्री होणार्या खतांची संगमनेरात नक्कल करुन विक्री होत असल्याबाबत कंपनीचे विक्री व्यवस्थापक आझम शहा इबाद शहा यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संगमनेरच्या मार्केट यार्ड परिसरात असलेल्या रोहिणी कृषी सेवा केंद्रात अशा प्रकारच्या बनावट खतांची विक्री करुन शेतकर्यांची फसवणूक केली जात असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले असून संबंधित कृषी केंद्राचे संचालक सीताराम मारुती गुंजाळ गेल्या काही कालावधीपासून अशा प्रकारे हुबेहुब नक्कल केलेल्या खतांच्या गोण्या विक्री करीत असल्याचे कंपनीच्या लक्षात आल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

यासाठी सीताराम गुंजाळ यांनी महाधन नावाच्या हुबेहुब गोण्या, त्यावरील अक्षरे व कंपनीचा लोगो वापरला आहे. या कृत्यामुळे संपूर्ण देशातील खतनिर्मिती क्षेत्रात सर्वात मोठे नाव असलेल्या या कंपनीच्या उत्पादनांच्या विश्वासार्हतेला धक्का बसला असून संबंधिताने कंपनीसह गोरगरीब शेतकर्यांची फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात आपली तक्रार असल्याचे त्यांनी दाखल फिर्यादीत सांगितले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी संगमनेरच्या रोहिणी कृषी सेवा केंद्राचे संचालक सीताराम मारुती गुंजाळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत. या वृत्ताने संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

1992 साली देशात अमोनिया उत्पादन करणार्या कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या दीपक फर्टिलायझर या कंपनीने खतनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यासाठी स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड या कंपनीची स्थापना करुन त्या माध्यमातून तळोजा (मुंबई) येथील खतनिर्मिती कारखान्यातून महाधन नावाच्या खताचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले. सुरुवातीला या खतांना महाराष्ट्रासह कर्नाटक व गुजरातमधून मोठी मागणी होती. कंपनीच्या 24:24:0 व बेंटोनाइट सल्फर या खतांचा टोमॅटो व कांद्यांना चांगला फायदा होत असल्याने अल्पावधीतच या कंपनीच्या खतांना देशभर मागणी होवू लागली.

संगमनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात टोमॅटो व कांद्यांची पिकं घेतली जातात. त्यामुळे साहजिकच या पिकांसाठी अतिशय पोषक ठरणार्या महाधन खतांना तालुक्यातूनही नेहमीच मोठी मागणी असते. त्याचाच फायदा घेवून काही महाभाग अशा प्रकारच्या नक्कल केलेल्या खतांची विक्री करुन कंपनी आणि पर्यायाने शेतकर्यांची फसवणूक करतात. संगमनेरात अशाच प्रकारे खते विकली जात असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर त्यांच्या प्रतिनिधींनी संगमनेरात येवून काही कृषी सेवा केंद्रांमधून तपासणीसाठी खतांचे नमुने घेतले. त्यावरुनच रोहिणी कृषी सेवा केंद्रात कंपनीचे नाव, मानचिन्ह व अन्य तपशिलांचा हुबेहुब वापर करुन बनावट खतांची विक्री होत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. संगमनेरच्या कृषी विभागानेही काही ठिकाणांहून नमुने घेत ते पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

संगमनेर तालुक्यात महाधन नावाने बनावट खतांची विक्री होत असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आल्यानंतर तालुक्यातील काही ठिकाणी खतांचे नमुने तपासले आहेत. रोहिणी कृषी सेवा केंद्रातील खताचे नमुने घेवून ते पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कृषी विभागाकडून पुढील कारवाई होईल. संबंधित कंपनीने पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला असून पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तालुक्यात महाधनच्या बनावट खत विक्रीची व्याप्ती फार मोठी नाही.
– प्रवीण गोसावी
तालुका कृषी अधिकारी, संगमनेर

