कोपरगावच्या शारदानगरमधील रस्ता ‘चिखलात हरवला’
कोपरगावच्या शारदानगरमधील रस्ता ‘चिखलात हरवला’
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. शारदानगर परिसरातील रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून सदरचा रस्ता ‘चिखलात हरवला’ असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेकडे केली आहे.

शहराच्या शारदा नगरमधील रहिवासी दरवर्षी पावसाळ्यात महत्वाच्या असलेल्या खराब रस्त्यांमुळे त्रस्त होवून आपापसात संताप व्यक्त करीत असतात. वारंवार पालिकेकडे तक्रारी करूनही या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे रहिवाशांनी पदरमोड करून या रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवले आहेत. मात्र यावर्षी पावसाचा मूड वेगळाच असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातच कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे यावर्षी नागरिक मुरुमासाठी खर्च करू शकत नाही. त्यात सदरचा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत प्रवास करावा लागत आहे. तर पायी चालणार्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. भविष्यात काही दुर्दैवी घटना घडू शकतात; त्याची जबाबदारी पालिका घेणार का? असा सवाल शारदा नगरमधील रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी आमदार आशुतोष काळेंनी लक्ष घालून त्वरीत मुरुम टाकून हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

