शनिशिंगणापूर-शिर्डी रस्त्यावर बेकायदा प्रवासी वाहतूक जोमात सुरू आठ दिवसांत एकही कारवाई झाली नसल्याने होतेय आश्चर्य व्यक्त

नायक वृत्तसेवा, नेवासा
शनिशिंगणापूर-शिर्डी रस्त्यावर सात पोलीस ठाण्यांची नजर असतानाही जिल्ह्यातील सर्वात मोठी बेकायदा प्रवासी वाहतूक दिमाखात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांत एकही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून 15 महिन्यांपासून दोन देवस्थानचे दर्शन घडविणारी बेकायदा प्रवासी वाहतूक बंद होती. आता दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्याने तीनशेहून अधिक वाहनांची वर्दळ नव्या जोमाने सुरू झाली आहे. आठ-दहा दिवसांत एकाही पोलीस ठाण्याने अशा वाहनांवर एकही कारवाई केली नाही हे विशेष. शिर्डी, राहाता, बाभळेश्वर, कोल्हार, राहुरी, सोनई व शनिशिंगणापूर असे सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही बेकायदा प्रवासी वाहतूक होते. शिर्डी व राहाता पोलीस ठाण्याचा अर्थपूर्ण व्यवहार साईबाबांच्या पुण्यभूमीत होत आहे. तर अन्य पाच पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस आपला प्रसाद घेण्यासाठी शिंगणापूरला येतात. सध्या पुजा-साहित्य दुकानदारांचे नाव व वाहनांची संख्या घेणे सुरू झाले आहे.

सध्या भाविकांच्या खासगी वाहनावर कारवाईचा धडका सुरू असताना बेकायदा प्रवासी वाहतूक दिमाखात सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शिर्डीतून भाविकांना शिंगणापूरला घेवून येणारे वाहन रस्त्याने चहा, उसाचा रस, नाश्ता व जेवणासाठी ठराविक ठिकाणीच थांबतात. पूजा-साहित्य घेण्याची सक्ती व दमदाटी केली जाते. या प्रवासी वाहतूक रॅकेटच्या सक्तीने मोठा त्रास होत असल्याचे भाविकांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू नसल्याचे पोलीस सांगत आहेत. कोरोना टाळेबंदीचा मोठा फटका सर्वांनाच बसला असल्याने सध्या सारे काही डोळे झाकूनच सुरू आहे. म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबत कारवाईचा आदेश द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Visits: 124 Today: 1 Total: 1416080

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *