संगमनेर तालुक्यातील पठारभाग बनतोय गुन्हेगारांच्या उत्पत्तीचे ठिकाण? राजगुरुनगर पोलिसांनी पकडलेल्या साकूर परिसरातील पाच आरोपींकडून सोळा दुचाकी हस्तगत
नायक वृत्तसेवा, घारगाव
मुळा नदीच्या पाण्याने समृद्ध झालेल्या तालुक्याच्या पठारभागातील साकूर आता गुन्हेगारांच्या उत्पत्तीचेे ठिकाण बनू पहात आहे. दोनच दिवसांपूर्वी दुर्मिळ खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी पुणे वन विभागाने साकुरमधील तिघांना जेरबंद केले असताना आता राजगुरुनगर पोलिसांच्या मदतीने याच भागातील पाच जणांची सराईत टोळी गजाआड झाली आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत विविध ठिकाणच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली असून सोळा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अवघ्या चारच दिवसांत झालेल्या या दोन्ही मोठ्या कारवायांनी तालुक्याच्या पठारभागात गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याचे सिद्ध केले आहे. राजगुरुनगर पोलिसांनी पकडलेले पाचही आरोपी सध्या घारगाव (ता.संगमनेर) पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्याकडून या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत राजगुरुनगर (जि.पुणे) पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात खेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी.एस.भोसले, पो.ना.सचिन जतकर, अंमलदार निखीलगिरी गोसावी व स्वप्नील गाढवे आदिंना गस्ती दरम्यान संशय आल्याने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाबळ रस्त्यावर त्यांनी नवनाथ विजय पवार (वय 21, रा.माळवाडी (साकूर)) व सुनील रामनाथ जाधव (वय 19, रा.माणूसवाडी, रणखांब) या दोघांना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यातून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड झाला. त्या दोघांनाही राजगुरुनगर पोलीस ठाण्यात नेवून अधिक चौकशी करता त्यांनी आपले अन्य साथीदार अजित रावसाहेब केदार (रा.रणखांब, ता.संगमनेर), रमेश अंबादास दुधवडे (रा.खैरदरा, ता.संगमनेर) व शिवाजी पोपट कातोरे (रा.जांबूत, ता.संगमनेर) आदिंसह विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानुसार राजगुरुनगर पोलिसांनी उर्वरीत तिघाही आरोपींना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करीत चार दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. त्यातून संशयित आरोपींनी जुन्नर, नारायणगाव, घारगाव, संगमनेर तालुका, अकोले व पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्यांच्याकडून आठ मोटारसायकलही हस्तगत केल्या. तेथील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर वरील पाचही संशयित आरोपींना राजगुरुनगर पोलिसांनी घारगाव पोलिसांकडे वर्ग केले. त्यानुसार घारगाव पोलिसांनी ट्रांझिट रिमांडवर घारगावात आणून त्यांची चौकशी केली असता 20 व 21 जानेवारी रोजी शेळकेवाडी (ता.संगमनेर) शिवारातून चोरीला गेलेली 60 हजार रुपये मूल्याची बजाज पल्सर (क्र.एम.एच.17/सी.एच.1764) व 40 हजार रुपये मूल्यांची एम.एच.17/सी.डी.0215 ही दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत केली.

वरील पाचही आरोपी सध्या घारगाव पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्यासोबतच चोरीच्या या साखळीत त्यांचे अन्य साथीदार, चोरलेल्या मोटारसायकल विकत घेणारे व विकण्यासाठी मदत करणारे अशा सगळ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घटनांमधून साकूर परिसरातील आरोपी समोर येवू लागल्याने पठारभाग गुन्हेगारांच्या उत्पत्तीचे ठिकाण तर बनू पहात नाही ना? अशी शंका संगमनेरकरांच्या मनात निर्माण झाली आहे.

तालुक्यातील पठारभागात आदिवासी ठाकर समाजाची मोठी वस्ती आहे. अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज अशी ठळक ओळख असलेल्या या समाजात आजवर गुन्हेगारीचे प्रमाण अगदीच नगण्य स्वरुपात होते. मात्र गेल्या काही दिवसांत साकूर परिसरात वास्तव्यास असलेल्या या समाजातील काही तरुणांना विविध गुन्ह्यांमध्ये अटक झाल्याने तेथील समाजधुरिणांनी याची गांभिर्याने दखल घेवून या समाजातील तरुणांशी संवाद साधण्याची गरज निर्माण झाली आहे. कधी नव्हे या भागातील आदिवासी तरुण गुन्हेगारी कृत्यांमध्ये आढळू लागल्याने तालुक्यात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

