अकोलेतील बेकरी व्यावसायिकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा बांधकाम प्रकल्पांविषयी तक्रार अर्ज करुन वारंवार खंडणी मागितल्याचा आरोप
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील प्रसिद्ध विकासकाच्या सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी वारंवार तक्रार अर्ज करुन ते माघारी घेण्यासाठी खंडणीची मागणी करुन त्यातील काही रक्कम स्वीकारल्यानंतरही पुन्हा एक कोटी रूपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अकोले शहरातील बेकरी व्यावसायिकाविरूद्ध अकोले पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ यांनी पत्रकार घेऊन दिलेली अधिक माहिती अशी की, लक्ष्मीकांत नाईकवाडी हे पूर्वी अर्बन जिनेसीस इन्फ्रकन प्रा. लि. या कंपनीत संचालक (भागीदार) होते. त्याच कंपनीत अकोले येथील बेकरी व्यावसायिक मयूर सुभाष कानवडे व त्याचे वडील सुभाष भागुजी कानवडे या दोघांनी गुंतवणूक करून कंपनीत संचालक (भागीदार) झाले होते. या दरम्यान संचालकांमध्ये मतभेद झाल्याने प्रकरण (एनसीएलटी) राष्ट्रीय औद्योगिक लवाद यांच्याकडे गेले. त्या प्रकरणात कंपनीने काही रक्कम देवून नाईकवाडी यांना मुक्त केले. सदर कंपनीमध्ये सन 2017 पासून नाईकवाडी यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. आणि त्या कंपनीस अगर संचालक यांना कोणतेही देणे लागत नाही. उलट न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कंपनीकडून घेणे आहे. त्या कंपनीबाबत सागर अंबाडेकर (पुणे), मयूर सुभाष कानवडे, सुभाष भागुजी कानवडे यांचा अद्यापही एनसीएलटीमध्ये वाद चालू आहे. 2017 पासून त्या कंपनीमधून वेगळे होवून अगस्ति डेव्हलपर्स ही संस्था स्थापन केली व त्याद्वारे बांधकाम सुरू केले आहे. त्यासाठी नाईकवाडी यांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, 2019 मध्ये अकोले येथील मयूर कानवडे व सुभाष कानवडे यांनी नाईकवाडी यांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये वारंवार हस्तक्षेप करुन त्रास दिला आणि ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले आहे. अगस्ति डेव्हलपर्स संस्थेमार्फत राजगुरुनगर येथे चालू असलेल्या प्रकल्पांसंदर्भातही मयूर कानवडे याने मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे खोटे तक्रार अर्ज केले आहे. त्यानंतर चौकशी केली असता हे तक्रार अर्ज व तोंडी हरकती मयूर कानवडे, वडील सुभाष कानवडे व काका गणेश कानवडे यांनी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अकोले येथील गट क्रमांक 162, 163 या अवसरे कुटुंबाच्या मिळकतीमध्ये धुमाळ व नाईकवाडी यांनी विकसन करार करुन जागेत बांधकाम परवानगीचा नकाशा तयार करुन दिला. मात्र त्या बांधकामात देखील गणेश कानवडे, मयूर कानवडे यांनी अडथळे आणणे सुरू ठेवले.

काही प्रतिष्ठीत व्यक्तींसोबत चर्चा करुन सुरुवातीला मागणी केल्याप्रमाणे त्यांना 4 लाख 25 हजार, 5 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश, त्यानंतर पुन्हा पाचवेळा 2 लाख रुपये जनलक्षमी पतसंस्थेमधून मयूर कानवडे याच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर पुन्हा 10 लाख रुपये मध्यस्थ महेश नवले मार्फत मयूर कानवडेच्या खात्यावर जमा केले. याप्रमाणे एकूण तीस लाख रुपयांची खंडणी मयूर कानवडे, सुभाष कानवडे यांनी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनतरही त्रास देणे सुरूच ठेवल्याने अकोले पोलिसांत तक्रार अर्ज दिला. मात्र, कोणतीही कारवाई केली गेली नाही. अखेर पोलिसांनी दखल घेत मयूर सुभाष कानवडे, गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 384, 385 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
