नेवाशाच्या गडाख बंधूंनी मंत्रालयालाही लावले ‘वाचनवेड’! मृदा व जलसंधारण मंत्रालयात उभारले छोटेखानी वाचनालय
नायक वृत्तसेवा, नेवासा
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने नेवासा तालुक्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर एरव्ही रुक्ष वाटणार्या मृदा व जलसंधारण मंत्रालयात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी स्वतः लक्ष घालून कल्पकतेने लोकाभिमुख बनवले आहे. मंत्री गडाख यांना मंत्रालयात मिळालेल्या दालनाची अंतर्गत सजावट त्यांनी आकर्षक तर केलीच. परंतु अवागतांसाठी छोटेसे वाचनालयही थाटल्याने मंत्रालयातील हे दालन मंत्रिमंडळात चर्चेचा विषय बनले आहे.
नेवाशाचे लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्याबरोबर प्रशांत गडाख हे मंत्रालयातील त्यांना मिळालेल्या दालनात आले. तेव्हा दालनाची स्थिती वेगळी होती. ही अवस्था पाहून मंत्री गडाखांनी प्रशांत गडाखांना दालनाच्या अंतर्गत सजावटीची जबाबदारी सोपवली. दालनात काम करणार्या कर्मचार्यांना, येणार्या जनतेला तिथे प्रसन्न वाटावे या कल्पकतेने प्रशांत गडाखांनी आर्किटेक्टला सूचना देऊन डिझाईन तयार करण्यास सांगितले. त्याचबरोबर बर्याचदा मंत्री गडाख हे कामात व्यस्त असल्यावर जनतेला प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठी एक छोटसं वाचनालयही तिथं करायला सांगितलं. हा बदल केल्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यानंतर प्रशांत गडाख हे मंत्रालयात आले असता त्यांनी दालनातील बदल पाहून समाधान व्यक्त केले. त्यांनी सर्व अधिकार्यांची बैठक घेत नेवासा तालुक्यातील विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावाही घेतला. महाराष्ट्राचा व्याप मंत्री गडाखांपुढे असतानाही ते तालुक्याकडे जातीने लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे यंत्रणेतील त्रुटी अजून कशा कमी होतील याबाबत अधिकारी वर्गाशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेतून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी नेवासा तालुक्यात वाचनालय चळवळ सुरू केली आहे. सध्या यशवंताचे 65 वाचनालये शासन अटी व नियमांचे पालन करून वाचकांसाठी खुली करण्यात आली आहेत. दरम्यान लॉकडाऊन काळात ग्रंथदूत संकल्पना राबवून वाचकांना घरपोहोच ग्रंथ, पुस्तक देण्याचा उपक्रम यशवंत वाचनालयांनी राबविला होता. अहमदनगर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचेही मुख्य आयोजक यशवंतराव गडाख होते. त्यांना वाचनाची जशी आवड आहे, तसाच त्यांच्या पुस्तकांचाही संग्रह मोठा आहे. त्यांचे स्वतःचे असे सुसज्ज वाचनालय आहे. त्यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना अनोखी भेट दिली आहे.
ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, त्या ज्ञानेश्वर मंदिरातील पैस खांबाला साक्षी ठेवून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाचन संस्कृत रुजविण्याचा संकल्प सोडला. त्यादिवशी तालुक्यातील जुनी बंद पडलेली 51 वाचनालये पुन्हा सुरू करण्यात आली. प्रत्येक वाचनालयाला 105 पुस्तके देण्यात आली होती. उपक्रम सुरू होऊन अवघे सहा महिने झालेले असताना आणखी नवीन 50 वाचनालये सुरू करण्यात आली.
मंत्री शंकरराव गडाखांकडे कामानिमित्त व भेटीसाठी येणार्यांची संख्या मोठी असते. मंत्री महोदय व अधिकारी यांच्या महत्त्वाच्या नियोजन बैठका असल्याने अनेकांना दालनात प्रतीक्षेत बसावे लागते. त्यांचा पुस्तकांच्या सहवासात वेळ व्यतीत व्हावा. याच उद्देशाने तेथे वाचनालय सुरू केले.
– प्रशांत गडाख (अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान)
प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री शंकरराव गडाख यांच्या मंत्रालयातील दालनाचे सुशोभीकरण करण्यात तर आलेच मात्र त्यांच्या संकल्पनेतून या दालनात वाचनालय सुरू करण्यात आले. मंत्र्यांच्या दालनात वाचनालय याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
– विजय कारंडे (शासकीय स्वीय सहाय्यक, मंत्रालय-मुंबई)