जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडचा ‘कहर’! जिल्ह्यात चार हजार, तर संगमनेर-अकोल्यात आढळले तब्बल पाचशे रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अधुनमधून जिल्ह्याला तात्पूरता दिलासा देणार्या कोविडच्या रुग्णसंख्येने आज मात्र अक्षरशः कहर केला असून जिल्ह्याने पहिल्यांदाच चार हजार रुग्णसंख्येचा उंबरठा गाठला आहे. आजच्या अहवालांतून अहमदनगर महापालिका क्षेत्र, नगर ग्रामीण व संगमनेर तालुक्यात तिनशेहून अधिक तर श्रीगोंदा, राहुरी, राहाता, कोपरगाव व पारनेर तालुक्यातून तब्बल दोनहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याने आता 1 लाख 75 हजार 40 तर संगमनेर तालुक्यानेही पंधरा हजारांचा आकडा ओलांडतांना 15 हजार 62 रुग्णसंख्या गाठली आहे. संगमनेर तालुक्याच्या आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरी भागातील रुग्णांची संख्या अवघी 46 असून उर्वरीत 303 ग्रामीणभागातील आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असून केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र या निर्बंधाचा कोविडच्या रोजच्या सरावरीवर कोणताही परिणाम झाल्याचे गेल्याचे पंधरा दिवसांत दिसून आले नाही. विशेष म्हणजे संपूर्ण महिन्याचा विचार केल्यास 15 एप्रिलनंतर चावेळा झालेले अपवाद वगळता जिल्ह्यात दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण समोर आले आहेत, यावरुन जिल्ह्यात कठोर निर्बंधांचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे. आजही जिल्ह्याने आजवरचे सर्व उच्चांक मागे टाकतांना तब्बल 3 हजार 953 रुग्णसंख्या गाठली आहे. त्यामुळे जिल्हा आता 1 लाख 75 हजारांहून अधिक रुग्णसंख्या गाठणारा जिल्हा ठरला असून सक्रीय रुग्णांच्या संख्येत आजही मोठी भर पडल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताणही शतपटीने वाढला आहे.

आजच्या एकूण रुग्णसंख्येत सर्वाधीक 660 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात आढळले असून नगर ग्रामीण क्षेत्रातूनही 406 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्यातून 349, श्रीगोंदा तालुक्यातून 298, राहुरी तालुक्यातून 285, राहाता तालुक्यातून 280, कोपरगाव तालुक्यातून 270, पारनेर तालुक्यातून 227, शेवगाव तालुक्यातून 199, जामखेड तालुक्यातून 180, श्रीरामपूर तालुक्यातून 170, नेवासा तालुक्यातून 159, अकोले तालुक्यातून 151 व कर्जत तालुक्यातून 110 असे उच्चांकी रुग्ण समोर आले आहेत. भिंगार लष्करी परिातील 79, इतर जिल्ह्यातील 41, लष्करी रुग्णालयातील 25 व अन्य राज्यातील सहा रुग्णांचाही आजच्या एकूण रुग्णसंख्येत समावेश आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत केवळ पाथर्डी तालुक्याने काहीसा दिलासा दिला असून तेथून केवळ 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अवघ्या एकाच महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत 80 हजार 134 रुग्णांची भर पडली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे प्रलंबित अहवाल एकाचवेळी समोर आल्याने संगमनेर व अकोले तालुक्यातील रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. या दोन्ही तालुक्यात मिळून आज पाचशे रुग्ण आढळून आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेचे 172, खासगी प्रयोगशाळेचे 144 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा केलेल्या चाचणीतून 33 अशा एकूण 349 अहवालातून संगमनेर शहरातील 46 जणांसह ग्रामीण भागातील तब्बल 303 रुग्णांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्यात एकाच महिन्यात सरासरी 183 रुग्ण दररोज या गतीने 5 हजार 491 रुग्णांची आजवरची अभूतपूर्व रुग्णवाढ झाली आहे. तर अकोले तालुक्यातूनही सरासरी 120 रुग्ण दररोज या वेगाने 3 हजार 587 रुग्ण समोर आले आहेत.

आज संगमनेर शहरातील श्रमपरिहार वसाहत, मालदाड रोडवरील 22 व 19 वर्षीय महिला, चावडी चौकातील 39 व 38 वर्षीय तरुण, अकोले नाक्यावरील 32 वर्षीय महिला, घोडेकर मळ्यातील 28 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 59 वर्षीय इसम, बाजारपेठेतील 51 वर्षीय इसम, चैतन्य नगरमधील 28 वर्षीय महिला, चंद्रशेखर चौकातील 53 वर्षीय इसम, गोविंदनगर मधील 45 वर्षीय महिला, गणेश नगरमधील 88 वर्षीय वयोवृद्ध इसम, शिवाजी नगरमधील 39 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, इंदिरा नगरमधील 55 वर्षीय महिलेसह 38 व 32 वर्षीय तरुण, नायकवाडपूर्यातील 30 वर्षीय तरुण, तहसील कचेरी जवळील 12 वर्षीय मुलगा,

नेहरु चौकातील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 37 वर्षीय तरुण, आठ वर्षीय मुलगा व पाच वर्षीय बालिका, पंपींग स्टेशन परिसरातील 24 वर्षीय तरुण, कुरण रोडवरील 45 वर्षीय महिला, सह्याद्री महाविद्यालयाजवळील 33 वर्षीय महिला, सुयोग सोसायटीतील 60 वर्षीय महिला, कोष्टी गल्लीतील 57 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला आणि 24 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 75 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 57 व 53 वर्षीय इसम, 37 वर्षीय दोघे, 33, 30, 22 व 20 वर्षीय तरुण, 70, 40, 37 वर्षीय दोघी व 32 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलगी अशा शहरातील एकूण 46 रुग्णांचा त्यात समावेश आहे.

