पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग ‘नाशिक-अकोले-पुणे’ असाच व्हावा! रेल्वेमार्ग कृती समितीचे सोमवारपासून अकोले तहसीलसमोर धरणे आंदोलन सुरू
नायक वृत्तसेवा, अकोले
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा मूळ सर्वेनुसार नाशिक-अकोले-पुणे मार्गाने व्हावा. या मागणीसाठी रेल्वेमार्ग कृती समितीने अकोले तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (ता.21) धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महारेलनुसार पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग पूर्व पाहणी आणि प्राथमिक सर्वेनुसार बोटा, घारगाव, पेमगिरी, देवठाण आणि सिन्नर अशा मार्गाने नाशिकला जात होता. अंतिक सर्वेनुसार तो पुणे-नाशिक डाव्या बाजूने महामार्गालगत जात होता. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम साकूर, अंभोरे, माळवाडी, पोखरी हवेली, येलखोप व जोर्वे या भागातून कसे काय चालू आहे? याचे आम्हांला कारण समजावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या फेरबदलामुळे आळेफाटा ते सिन्नर असा त्रिकोण करून यामधील अंतर 35 ते 40 किलोमीटरने वाढले आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च 3000 कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच प्रवास खर्चासह प्रवासाची वेळ सुद्धा वाढणार आहे. याचा परिणाम सामान्य नागरिक व सरकारी तिजोरीवर पडणार असून 16 हजार कोटी रुपयांची तरतूद, 21 किलोमीटर अंतराच्या बोगद्यांचे नियोजन, 27 किलोमीटर खोल दर्यांमधील उंच पूल असताना रेल्वे मार्गासाठी लांब मार्गाची निवड का केली? असा सवालही केला आहे.
कोणताही महामार्ग तयार होताना दोन मोठ्या औद्यागिक वसाहती कमीत कमी अंतरामध्ये जोडून दरम्यानच्या अंतरामध्ये औद्योगिक कृषी, पर्यटन ह्या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे. अकोले तालुका हा पर्यटन, कृषी, पाणी ह्या सर्व बाबतीत परिपूर्ण असून अजूनही मागासलेला आहे. तरी नाशिक-अकोले-पुणे असा रेल्वेमार्ग झाल्यास तो अंदाजे 150 किलोमीटरमध्ये आणि कमीत कमी प्रकल्प खर्चासह पूर्ण होवून अकोलेमधील हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर, भंडारदरा धरण या पर्यटन स्थळांचा विकास होईल. सध्या दळवळणाचे कुठलेही साधन नसताना भंडारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड पर्यटनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशातून लाखो पर्यटक येतात. जर रेल्वेसारखे माध्यम उपलब्ध झाले तर हीच पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन विकास होईल. त्यातून रेल्वेचे उत्पन्न सुद्धा खूप वाढेल. तसेच कृषीचा जर विचार केला तर भाजीपाला कांदा, बटाटे, यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात तालुक्यात घेतली जातात. यांच्या वाहतुकीसाठी या रेल्वेमार्गाचा खूप उपयोग होऊ शकतो. या सर्व गोष्टींमुळे अकोले आदिवासी तालुक्यातील लोकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात उंचावणार आहे. पर्यटन आणि कृषीने समृद्ध असलेल्या तालुक्यातून गेल्यास सरकारी तिजोरीवरचा आर्थिक भार देखील कमी होणार आहे. म्हणून हा रेल्वेमार्ग नाशिक-अकोले-पुणे असा व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश नवले, स्वाभिमान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले, नीलेश तळेकर, शिवसेना नेते प्रमोद मंडलिक, प्रदीप हासे, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, अमोल पवार, संतोष फापाळे, सतीश फापाळे, शांताराम संगारे, नितीन नाईकवाडी, किरण देशमुख, शुभम आंबरे, सुशांत आरोटे, चंद्रशेखर आंबरे लढा देत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माकप नेते डॉ. अजित नवले, कॉ. शांताराम वाळुंज, आरपीआयचे राज्य सचिव विजय वाकचौरे, बाजार समितीचे सभापती पर्बत नाईकवाडी, कोतूळचे सरपंच राजेंद्र देशमुख, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे, खिलारी सर, आनंद वाकचौरे, अॅड. भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वर वाकचौरे, व्यापारी संघटनेचे गौरव मैड, मयूर रासने, अनिल कोळपकर आदी उपस्थित होते.