तेरा बंदीवान व आठ पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका
तेरा बंदीवान व आठ पोलिसांना कोरोना संसर्गाचा धोका
राहुरी पोलीस निरीक्षकांचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, राहुरी
गुरुवारी (ता.27) राहुरी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली. त्यानंतर कोरोना तपासणीसाठी त्यांचे स्त्राव घेण्यात आले. परंतु त्यांचा कोरोना तपासणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांची रवानगी कारागृहातील बराकीत करण्यात आली. त्यातील एकजण शुक्रवारी (ता.28) रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या चारजणांची क्षमता असलेल्या बराकीत 13 जणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह बंदीवानाने 24 तास काढले आहेत. यामुळे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे बराकीतील 13 बंदीवान व कारागृहाचे आठ सुरक्षा पोलीस कर्मचार्यांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे गुरुवारी सकाळी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात घातक शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात आठजण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील एकवीस दिवसांनी गुरुवारी (ता.27) पोलिसांना शरण आले. राहुरी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांना इतर कैद्यांबरोबर बराकीत ठेवण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी करण्यासाठी स्त्राव घेण्यात आले. कोरोना तपासणीचा अहवाल मिळण्याची वाट न पाहता राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी रात्री तेरा बंदीवान असलेल्या बराकीत ठेवले. शुक्रवारी रात्री त्यातील एक 23 वर्षांचा पोलीस कोठडीतील संशयित आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पोलीस ठाण्यात धडकला. त्यामुळे राहुरी पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला बराकीतून हलविण्यासाठी धावपळ उडाली. त्यानंतर बराकीत निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याची नामुष्की आली.
दरम्यान, कोरोना तपासणीचा अहवाल येईपर्यंत दोन्ही आरोपींना स्वतंत्र ठिकाणी सुरक्षितस्थळी ठेवणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना बराकीत ठेवण्याचा पोलीस निरीक्षक देशमुख यांचा अट्टाहास व हलगर्जीपणा नडला. त्यामुळे बराकीतील इतर तेरा बंदीवान कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आले. दोन दिवस कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात आठ पोलीस कर्मचारी यांचाही संपर्क आला. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांचा अट्टाहास व हलगर्जीपणा इतरांना जीवघेणा ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.