कोपरगाव तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून सव्वा कोटीची वसुली पंतप्रधान किसान निधी योजनेचा अनेक बोगस शेतकर्‍यांनी घेतला लाभ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कोपरगाव तालुक्यातील 1 हजार 416 अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून 1 कोटी 21 लाख रुपयांची रक्कम 12 फेब्रुवारी अखेर वसूल करण्यात आली आहे. ही वसुली मागील सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी देशातील पंतप्रधान किसान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्ष 6 हजार इतकी रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संपूर्ण वर्षभरात दोन हजार रुपये याप्रमाणे तीनवेळा ही रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. परंतु, या योजनेचा लाभ घेताना काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्या निकषांनुसार जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांना हे अनुदान मिळत आहे. परंतु, निकषात बसत नसतानाही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांचा शासनाच्यावतीने सर्व्हे करण्यात आला.

कोपरगाव तालुक्यात एकूण 34 हजार शेतकर्‍यांनी या योजनेत सभाग घेतला होता. त्यापैकी शासनाच्या सर्व्हेत 3 हजार 730 शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे. या अपात्र लाभार्थ्यांकडून 2 कोटी 46 लाख रुपयांची रक्कम पुन्हा वसूल करण्यात येणार आहे. त्यापैकी 1 हजार 416 शेतकर्‍यांकडून 1 कोटी 21 लाख वसूल करण्यात आले आहे. तर उर्वरित 2 हजार 314 शेतकर्‍यांकडून 1 कोटी 25 लाख रुपये वसूल करण्यात येणार आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील सर्वच बँकेच्या अधिकार्‍यांना निर्देश दिलेले आहे. त्यामुळे अशा सर्वच अपात्र लाभार्थींनी त्यांच्या बँक खात्यात रक्कम भरल्यास त्याच खात्यातून बँकेमार्फत ही रक्कम शासनाकडे जमा होत आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत वरील रक्कम शासनाकडे जमा झाली आहे.

या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वच अपात्र लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत जेवढी रक्कम या योजनेतून घेतली आहे. अशा सर्वच अपात्र लाभार्थ्यांच्या खात्याला रक्कम वसुलीसाठी लिंक लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही रक्कम वसूल होत आहे.
– योगेश चंद्रे (तहसीलदार,कोपरगाव)

Visits: 76 Today: 1 Total: 1111458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *