भेंडा येथील शेळी तब्बल दीड लाख रुपयांना विकली! आफ्रिकन बोर जातीची शेळी; व्यवहाराची परिसरात रंगली चर्चा
नायक वृत्तसेवा, नेवासा
दूध देणार्या गायी किंवा म्हशींना लाखो रुपयांची किंमत येत असल्याची उदाहरणे आपण नेहमी ऐकतो. तर कधी ईदसाठी महत्वाचा म्हणून चंद्रकोर असलेल्या बोकडालाही लाखोंची मागणी येते. मात्र, या तुलनेत शेळ्याही कमी नाहीत. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण शेळी तब्बल दीड लाख रुपयांना विकली गेली आहे. आफ्रिकन बोर जातीची ही शेळी असल्याचे सांगण्यात आले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप परशराम मिसाळ यांचा शेळी पालनाचा शेती सोबतच जोडव्यवसाय आहे. त्यांच्याकडील ही शेळी फलटण येथील तेजस भोईटे यांनी तब्बल दीड लाख रुपये मोजून खरेदी केली. या व्यवहाराच्या वेळी उद्योजक बापुसाहेब नजन, राजेंद्र तागड, बाळासाहेब मिसाळ, पिंटू वाघडकर, किशोर मिसाळ उपस्थित होते. या व्यवहाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शेळी पालन व्यवसाय करणारे मिसाळ यांनी सांगितले, ‘दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचा गर्भ देशी शेळीच्या गर्भाशयात ठेवून त्यापासून भारतात ही जात वाढविण्यात आलेली आहे. या जातीच्या शेळ्या आपण उपलब्ध करून त्यांचे पालन केले आहे. या जातीमध्ये प्रतिकारशक्ती अधिक असते. त्यांची वाढही चांगली होती. दिवसाला साधारणपणे 200 ते 250 ग्रॅमने त्यांचे वजन वाढत जाते. त्यामुळे या जातीच्या बोकडांना चांगला भाव मिळतो. साधारणपणे तीन महिन्यांत बोकड 25 ते 30 किलो वजनाचा होतो. आपल्याकडील प्रचलित जातींपेक्षा ते जास्त आहे. त्यामुळे शेतकर्यांना कमी काळात जास्त उत्पन्न मिळते. वजनदार बोकडांना जन्म देणार्या म्हणून या जातीच्या शेळ्यांना जास्त किंमत आहे.’ असे मिसाळ म्हणाले.
शेळी खरेदी केलेले भोईटे म्हणाले, ‘आपण खरेदी केलेली शेळी दोन वर्षे वयाची आहे. तिचे वजन 70 किलो आहे. लवकरच ती पिल्लांना जन्म देणार आहे. एकावेळी दोन किंवा तीन पिल्ले नक्की होतात. काही महिन्यांतच त्यांच्या विक्रीतून लाखो रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या किमतीला ही शेळी विकत घेतली.’ असेही त्यांनी सांगितले.