कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्राणी व पक्षी प्रगणना पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचे छायचित्र घेऊन केली नोंदणी

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव विभागाकडून प्राणी व पक्षांची प्रगणना करण्यात आली आहे. या प्रगणनेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी व पक्षांचा अधिवास अद्यापही टिकून असल्याचे दिसून आले.

भंडारदरा धरणालगत असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्षांची वन्यजीव विभागाकडून प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाकडून प्रगणननेसाठी पाणवठ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी वन्यप्राण्यांच्या निरीक्षणासाठी पाणवठ्यालगतच झाडांवर निरीक्षण मनोरे उभारले जातात. यावर्षी वन्यप्राण्यांच्या प्रगणनेसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुणे, अहमदनगर व नासिक विभागातून वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता. प्रगणनेसाठी कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे, शिंगणवाडी या परिसरातील पाणवठ्यांवर निरीक्षणासाठी मनोरे उभारण्यात आले होते. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ चंद्राचा प्रकाश असल्याने पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे छायचित्र घेण्यात येऊन नोंदणी करण्यात आली.

भंडारदर्‍याच्या अभयारण्यात वानर, खार, ससा, रानमांजर, तरस, माकड, मुंगूस, रानडुक्कर, भेकर, कोल्हा, रानगवा, नीलगाय, सांबर, शेकरु व बिबट्या हे प्राणी दिसून आले. या पक्षांमध्ये बगळा, लावरी, खंड्या, साळुंकी, कुंभार कुकडा, होला, घुबड, रानकोंबडी, रानतांबी, मोर, रानकोंबडा, कोकरुस, फेसा, पाणकोंबडी, केगई व इतर अनेक पक्षी दिसून आले. यामध्ये अभयारण्यामध्ये बिबट्यांचा सहवास अल्पप्रमाणात दिसून येत असून फक्त 4 बिबट्यांची नोंद झाली आहे. तर 1 रानगवाही गेल्या दोन-तीन वर्षांपासून अभयारण्यात मुक्कामास असल्याचे लक्षात येत आहे. वानर व माकड यांचा जंगलात मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून प्रगणेनत अनुक्रमे वानरांची संख्या 281 अशी आहे तर माकडे 213 असल्याचे लक्षात आले. रानडुक्करांचाही मोठ्या प्रमाणात अधिवास असल्याचे लक्षात येत आहे. तसेच रतनवाडी परिसरात नीलगाय व सांबर टिकून असून शेकरुही जंगलात वास्तव्यास आहेत. पक्षांचांही अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे प्रगणनेवरुन लक्षात येत आहे. मात्र अभयारण्यातून चिमणी गायब झाली असल्याचे लक्षात येते. या वन्यजीवांच्या प्रगणनेसाठी वनसंरक्षक अधिकारी यशवंत केसकर, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, वनपाल रवींद्र सोनार, भाऊसाहेब मुठे, तसेच वनकर्मचारी चंद्रकांत तळपाडे, महिंद्रा पाटील, सरोदे ताई, संजय गिते, गुलाब दिवे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांचीही उपस्थिती होती.

Visits: 10 Today: 1 Total: 80028

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *