नाशिक व राहुरीच्या ‘नानां’मध्ये विभागली संगमनेरची शिवसेना! दोन्ही गटांकडून परस्परविरोधी आंदोलने; आता थेट पदाधिकार्यांवरच बदनामीचा गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शनिवारी दैनिक सामनातून जाहीर झालेल्या तालुक्यातील नूतन पदाधिकार्यांच्या नावांवरुन उसळलेला शिवसेनेतील अंतर्गत कलह आठवडा उलटल्यानंतरही कायम आहे. या निवडी जाहीर झाल्यानंतर एका गटाने त्या विरोधात आंदोलन करतांना संपर्कप्रमुख बबनराव घोलप (नाना) यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. तर, वाढती नाराजी लक्षात घेवून या निवडींना स्थगिती देण्यात आल्यावर दुसर्या गटाने जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (नाना) यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. या दोन्ही आंदोलनातून शिवसेनेत आजवर असूनही अदृष्य असलेली गटबाजी स्पष्टपणे दिसू लागली असून नाशिक व राहुरीच्या नानांमध्ये संगमनेरची शिवसेना विभागल्याचे समोर आले आहे. शनिवारी राहुरीच्या नानांची प्रतिमा दहन करणार्या सोळा जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता चक्क उपजिल्हा प्रमुखांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहरप्रमुखांसह युवासेनेच्या तालुकाध्यक्षांवर बदनामीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकारांनी आधीच संकटात असलेल्या शिवसेनेचे पाय आणखीन खोलात गेले आहेत.

मागील शनिवारी (ता.29) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता तालुक्यातील नूतन पदाधिकार्यांच्या नावांची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सुरुवातीला कोपरगाव व नंतर अकोल्यात विरोध प्रदर्शन झाले. अकोल्यात तर तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या समर्थकांनी संपर्कप्रमुख बबनराव घोलप (नाना) यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर करीत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचेही आंदोलन केले. त्याच्या दुसर्याच दिवशी त्यांच्याच समर्थकातील दुसर्या गटाने नाशिकच्या नानांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून प्रतिमेचे शुद्धीकरण करण्यात आले. त्याचे पडसाद कोपरगावमध्येही उमटले आणि तेथेही या निवडींना विरोध करण्यात आला.

नूतन पदाधिकारी निवडीत संगमनेर तालुकाप्रमुख म्हणून गेल्या दशकापासून काम करणार्या जनार्दन आहेर यांना भाजपा नेत्यांशी जवळीक असल्याच्या आरोपावरुन बाजूला करुन त्यांच्या जागी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेतील एका गटाने सोमवारी (ता.31) रायतेवाडी फाटा येथे आंदोलन करीत संपर्कप्रमुख बबनराव घोलप (नाना) यांच्या प्रतिमेस जोडे मारले. यावेळी त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेचाही वापर केला गेला असा आरोप आहे. अकोले, कोपरगाव व संगमनेर येथे एका पाठोपाठ झालेल्या या आंदोलनांची दखल घेत शिवसेनेने (ठाकरे गट) गेल्या शनिवारी जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीला शुक्रवारी (ता.4) स्थगिती दिली. त्यामुळे सुरुवातीचे चार दिवस नूतन पदाधिकार्यांचे सत्कार सोहळे व आनंदोत्सव सुरु असतानाच त्यात विरजन पडल्याने शिवसेनेतील दुसरा गट नाराज झाला.

नूतन पदाधिकार्यांच्या नावाला स्थगिती मिळाल्याने दुसर्या गटातील पदाधिकार्यांच्या नाराज समर्थकांनी शनिवारी (ता.5) दुपारी
बारा वाजता बसस्थानक चौकात आंदोलन करीत या प्रकारामागे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (नाना) यांचाच हात असल्याच्या संशयावरुन त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी ‘खेवरे हटाओ, शिवसेना बचाओ’ अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. शनिवारचे आंदोलन पोलिसांची परवानगी न घेता केले गेल्याने व त्यातच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होवून शहर पोलीस ठाण्यात सोळा जणांविरोधात 37 (1)चे उल्लंघन केल्याप्रकरणी 135 प्रमाणे कारवाई केली. त्यामुळे राजकीयदृष्ट्या वरचढ ठरण्याच्या प्रयत्नात असलेल्या या गटाची बाजू कमजोर झाली.

त्यामुळे शनिवारी (ता.5) तालुकाध्यक्षपदी निवड होवूनही स्थगिती मिळालेले व त्यामुळे पुन्हा उपजिल्हा प्रमुखपदावर कायम राहिलेल्या भाऊसाहेब हासे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जातून पदाधिकारी निवडीचा संपूर्ण प्रसंग सांगताना त्याला विरोध करीत रायतेवाडी फाट्यावर झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करीत संपर्कप्रमुख बबनराव घोलप (नाना) यांच्या प्रतिमेस जोडे मारले गेले व त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याचे सांगण्यात आले. या घटनेला जबाबदार असलेल्या जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, संगमनेर शहर शिवसेना प्रमुख प्रसाद पवार, अमोल कवडे, युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, कथित शिंदे गटातील समीर ओझा, कैलास वाकचौरे यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

‘त्या’ तक्रार अर्जाची दखल घेत शहर पोलिसांनी आता शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख प्रसाद पवार (रा.विद्यानगर), अमोल कवडे
(रा.पावबाकी रोड), रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे (रा.इंदिरानगर) व युवासेनेचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले (रा.बिरेवाडी) यांनी 31 ऑक्टोबर रोजी रायतेवाडी फाट्यावर आंदोलन करुन संपर्कप्रमुख बबनराव घोलप (नाना) यांच्याविरोधात बदनामीकारक घोषणाबाजी व खोटे आरोप केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 500 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या कारवाईने आता शिवसेनेच्या दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले असून संगमनेर शहर शिवसेनेतील गटबाजी उफाळून बाहेर आली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान संपर्कप्रमुख बबनराव घोलप व उत्तर जिल्ह्याचे प्रमुख रावसाहेब खेवरे या दोघांनाही ‘नाना’ या नावाने ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत अनिश्चितता निर्माण झालेली असताना विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी बबनराव घोलप यांच्यावर शिर्डी लोकसभेचा भार देण्यात आला. मात्र आता नाशिकच्या असलेल्या बबनराव घोलप व राहुरीच्या रावसाहेब खेवरे या दोन्ही नानांच्या नावाने शिवसेनेत उभे दोन गट पडले असून त्यातील एका गटाने घोलप यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा तर दुसर्या गटाने रावसाहेब खेवरे यांची प्रतिमा दहन करण्याचा कार्यक्रम राबविल्याने संगमनेरची शिवसेना नाशिक व राहुरीच्या ‘नानां’मध्ये विभागाली गेली आहे.

