अमरधामच्या नूतनीकरणास पालिकेने गती द्यावी; पुरोहित प्रतिष्ठानची मागणी
अमरधामच्या नूतनीकरणास पालिकेने गती द्यावी; पुरोहित प्रतिष्ठानची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेने अमरधाम स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामास गती द्यावी, अशी मागणी पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने अग्नीसंस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने पालिकेने गंभीर दखल घेऊन या कामाला वेग देणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिष्ठानने पत्रकाद्वारे म्हंटले आहे. नूतनीकरण करताना अस्थीविसर्जन कुंड बांधण्यात यावे; ज्यामुळे नदीच्या पाण्यात अस्थी विसर्जन करणे बंद होऊन नदी प्रदूषण मुक्त होण्यास सहाय्य होईल असेही निवेदनात नमूद केले आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांच्यासह सदस्यांनी नुकतेच पालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर निवेदन दिले. संगमनेर नगरपालिकेने मागील काही महिन्यांपासून अमरधामचे नूतनीकरण करण्याचे सुरु केलेले कार्य नक्कीच स्तुत्य आहे. अनेक वर्षांपासून नूतनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. अमरधामची समाजाला असलेली गरज लक्षात घेऊन हे काम अधिक गतीने होण्याची अपेक्षा अगदी रास्त आहे. वादळी पाऊसपाणी, सोसाट्याचा वारा यामुळे अनेकदा अंत्यसंस्कार प्रसंगी खूप तारांबळ उडून जाते. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून पालिका यंत्रणेने हे काम युध्द पातळीवर पूर्ण करावे असे प्रतिष्ठानने निवेदनात म्हंटले आहे. नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रतिष्ठान प्रत्येक अंत्यसंस्कार प्रसंगी अस्थी विसर्जन नदीच्या पाण्यात न करता पात्राच्या कडेला खड्ड्यात करण्यास अनेक वर्षांपासून प्रोत्साहित करीत आहेत. सर्वांनी त्याचे अनुकरण करावे यासाठी पालिकेने नूतनीकरण मोहिमेंतर्गत अस्थीकुंड निर्माण केल्यास सर्वजण त्यात अस्थी विसर्जित करतील आणि नदी प्रदूषण टाळता येणे सहज शक्य होईल असे प्रतिष्ठानचे मत आहे. याप्रसंगी अध्यक्ष भाऊ जाखडी, उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, विशाल जाखडी आदी उपस्थित होते.