अकोले महावितरणसमोर भाजपचे ‘टाळे ठोको’ आंदोलन

नायक वृतसेवा, अकोले
घरगुती व शेतीसाठी वापरल्या जाणार्या वीजेची वाढीव बिले माफ करावीत, शेतकर्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करून तोडलेली वीज जोडणी पूर्ववत करावी. अन्यथा पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर पुन्हा ‘टाळे ठोको’ आंदोलन केले जाईल असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे.

अकोले भाजपच्यावतीने शुक्रवारी (ता.5) महावितरण कार्यालयासमोर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, शंभू नेहे, मच्छिंद्र मंडलिक, अमोल येवले आदिंसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने वीजे बिले माफ करण्याची घोषणा केली होती. आता सरकारने आपला निर्णय फिरवला असून पन्नास टक्के वीज बिल भरणार्याला व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज बिल न भरणार्या ग्राहकांची जोडणी तोडण्यात येत आहेत. हा वीज ग्राहकांवर अन्याय असल्याचा घणाघात पिचड यांनी केला आहे. कोरोना काळात महावितरणने जादा बिल आकारणी केली आहे. तसेच जोडणी तोडलेल्या ग्राहकांची जोड पूर्ववत करावी, संपूर्ण वीज बिल माफ करावे, शेतकर्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा अशा मागण्या केल्या आहेत. अन्यथा पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर पुन्हा टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
