स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर! भाजपकडून स्पष्ट संकेत; संगमनेरात गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीत राज्यात प्रचंड यश मिळाल्याने सध्या भारतीय जनता पक्षाचे आत्मबळ आकाशी भिडले आहे. त्यातूनच भाजपने 175 पेक्षा अधिक जागांवर उमेदवार दिले असते तर राज्यात स्वबळावर सरकार स्थापन झाले असते असा विचारही पक्षात जोर धरीत असल्याने त्याचे प्रतिबिंबही आता उमटू लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यातून भाजपच्या पोटातील गोष्ट ओठांवर आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे. गुरुवारी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये महायुती करायची की नाही याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात गेल्या निवडणुकांची पुनरावृत्ती होणार असल्याचे चित्र आता निर्माण होवू लागले आहे.


महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करताना तब्बल 230 (80 टक्के) जागा पटकावल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने 149 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील तब्बल 132 जागांवर पक्षाला यश मिळाले. त्यामुळे महायुतीत भाजपचे मनोबल प्रचंड उंचावले आहे. या निकालानंतर भाजपमधील एका मोठ्या गटाकडून राज्यातील जनता पक्षासोबत असल्याचे वारंवार सांगितले जात असून पक्षाने विधानसभेच्या रिंगणात 175 पेक्षा अधिक उमेदवार दिले असते तर राज्यात भाजपचे स्वबळावर सकार स्थापन झाले असते असा दावाही केला जात आहे. त्यामागे लाडक्या बहिणींसह धर्माच्या नावावर एकवटलेल्या मतांची ताकद असल्याचेही आता लपून राहिलेले नाही.


1990 च्या दशकांत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी मैत्री करीत राज्यात पाय रोवण्यास सुरुवात केली. मात्र 2012 साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेल्या 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाला. त्यातून या दोन्ही पक्षांची जवळपास 25 वर्षांची मैत्री मोडली आणि दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र निकालानंतर दोघांनीही पुन्हा एकत्र येवून सरकार स्थापन केले. परंतु 2016 साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी दोन्ही पक्षांमध्ये राज्यात मोठाभाऊ कोण? यावरुन निर्माण झालेले वितुष्ट पुन्हा उफाळून बाहेर आले. त्यातून दोन्ही पक्षांनी या निवडणुकांसाठी महायुती करण्याऐवजी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे ठरवले आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे त्यावेळी निवडणुकांना सामोरे गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्थाही त्यावेळी महायुतीसारखीच होती.


त्यावेळच्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 (अ) मधून शिवसेनेचे लखन घोरपडे तर, प्रभाग क्रमांक 11 (ब) मधून भाजपच्या मेघा भगत यांचा विजय वगळता दोन्ही पक्षांना फारकाही मिळवता आले नाही. त्यातही पुढे बनावट जातप्रमाणपत्राच्या कारणावरुन सेनेच्या घोरपडे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. तर, थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड झालेल्या त्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसकडून रिंगणात उतरलेल्या दुर्गा तांबे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कैलास उर्फ अप्पा केसेकर, भाजपकडून ज्ञानेश्‍वर करपे व राष्ट्रवादीकडून शौकत जहागिरदार यांच्यासह तिघा अपेक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले होते.


1990 पासून 2016 पर्यंतच्या निवडणुका एकत्रित लढलेल्या भाजप-शिवसेनेसाठी त्यावेळची निवडणूक स्थानिक पातळीवर आपापली ताकद दाखवणारी ठरली. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार्‍या दुर्गा तांबे यांनी 15 हजार 161 (42 टक्के) मतं मिळवताना विजय संपादीत केला. तर, 9 हजार 405 (26 टक्के) मतांसह शिवसेनेचे अप्पा केसेकर दुसर्‍या, 6 हजार 209 (17.22 टक्के) मतांसह राष्ट्रवादीचे शौकत जहागिरदार तिसर्‍या आणि 4 हजार 199 (11.65 टक्के) मतांसह भाजपचे ज्ञानेश्‍वर करपे चौथ्या स्थानावर होते. त्यावेळी राज्य सरकारमध्ये एकत्रित असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार्‍या स्थानिक भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांची एकत्रित मतं 13 हजार 604 (37.74 टक्के) इतकी होती.


त्या निवडणुकीनंतर आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होवू लागली असून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महत्त्वकांक्षा दुणावलेल्या भाजपमध्ये स्वबळावर लढण्याची मानसिकता वाढीस लागल्याचे दिसत आहे. गुरुवारी (ता.26) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसलूमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या स्थितीला बळ देणारे वक्तव्य केले असून पुढील वर्षी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती करायची की, स्वतंत्रपणे लढायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकार्‍यांना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाही पालिका निवडणूक बहुरंगी ठरण्याची दाट शक्यता आहे.


गेल्या पालिका निवडणुकीत भाजपने महायुतीत लढायचे की स्वतंत्रपणे याचा फैसला स्थानिक पातळीवर सोडला होता. त्यातून या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याचा फायदा काँग्रेसला होवून दुर्गा तांबे यांचा सलग तिसर्‍यांदा 5 हजार 756 मतांनी विजय झाला. तर, अति महत्त्वकांक्षा बाळगणार्‍या स्थानिक भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यावेळी संगमनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडून शिवसेनेने बाजी मारली आहे. त्याचा स्थानिक राजकारणावर कितपत परिणाम होतो हे देखील यंदाच्या पालिका निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.

Visits: 69 Today: 2 Total: 254875

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *