धरणांच्या पाणलोटात आषाढसरींचे तांडव! रतनवाडीत विक्रमी पाऊस; मुळानदी दहा हजार क्यूसेकवर..


नायक वृत्तसेवा, अकोले
धरणांच्या पाणलोटालाच प्रदीर्घ ओढ देणार्‍या पावसाने गेल्या चोवीस तासांत मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्राला अक्षरशः झोडपून काढले असून रतनवाडीत विक्रमी साडेअकरा इंच पावसाची नोंेद झाली आहे. मंगळवारी सायंकाळपासून जोर चढलेल्या पावसाने भंडारदरा धरणात तब्बल 803 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणाने सात हजार दशलक्ष घनफूटांचा टप्पा गाठला आहे. भंडारदर्‍यापाठोपाठ मुळा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोटातही आषाढसरींनी तांडव घातले असून हंगामात पहिल्यांदाच मुळानदीने 10 हजार क्यूसेक पाण्याची पातळी ओलांडली आहे. कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाचा जोर टिकून असल्याने निळवंडे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवू लागली आहे. एकीकडे पाणलोटात पावसाचे धुमशान सुरु असताना दुसरीकडे लाभ क्षेत्रात दोन दिवसांपासून भीज पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे.

यंदा धरणांच्या पाणलोटासाठी संपूर्ण जून आणि निम्माअर्धा चालू महिना जेमतेम पावसाचा गेल्यानंतर जोरदार पुनरागमन करणार्‍या पावसाने सगळ्याच धरणांचा नूर पालटला आहे. गेल्या चार दिवसांत संपूर्ण पाणलोटात कमी-अधिक प्रमाणात कोसळणार्‍या आषाढसरींनी सातत्य कायम ठेवल्याने जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांमधील पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचले आहेत. धनिष्ठा नक्षत्रात कोसळणार्‍या आषाढसरींना शततारका नक्षत्राच्या पूर्वार्धातच जोर चढल्याने मंगळवारी सायंकाळपासून पाणलोटात पावसाचे तांडव रंगले असून सह्याद्रीच्या कडेकपारीतून शेकडो जलप्रपात धरणीच्या दिशेने खळाळू लागले आहेत. या परिसरातील ओढ्या-नाल्यांनाही नद्यांचे स्वरुप आले असून धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.


गेल्या चोवीस तासांचा विचार करता मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत एकट्या भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात 328 दशलक्ष घनफूट तर, सायंकाळी सहा ते आज सकाळी सहा वाजेपर्यंतच्या बारा तासांत तब्बल 475 दशलक्ष घनफूट अशा एकूण 803 दशलक्ष घनफूट पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. काल सायंकाळपासून या धरणाच्या पाणलोटातील रतनवाडी, घाटघर, पांजरे आणि भंडारदरा परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून अवघ्या चोवीस तासांतच एकट्या रतनवाडीत 285 मिलीमीटर (11.5 इंच), घाटघरमध्ये 270 मिलीमीटर (10.5 इंच) आणि पांजर्‍यात 255 मिलीमीटर (10 इंच) इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भंडारदर्‍याचा पाणीसाठाही फुगला असून आज सकाळी 6 वाजता धरणात 6 हजार 986 दशलक्ष घनफूट (63.28 टक्के) इतके पाणी जमा झाले होते.


मुळा खोर्‍यातील हरिश्‍चंद्रगडाच्या शिखररांगेतही पावसाचे धुमशान सुरु असून सलग कोसळणार्‍या तुफान आषाढसरींनी मुळा खोर्‍यातील शेकडों ओढ्या-नाल्यांना अक्षरशः उधाण आले आहे. पाचनई, कोथळे, कुमशेत, आंबित, खडकी, लव्हाळी, पेठेची वाडी, शिरपूंजे अशा सर्वच क्षेत्रात तुफानी जलधारा कोसळत असल्याने आज सकाळी 6 वाजता लहितजवळील मुळानदीने रौद्ररुप धारण केले असून तब्बल 10 हजार 342 क्यूसेकचा वेगवान प्रवाह मुळा धरणाच्या दिशेने झेपावत आहे. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणाच्या जलसाठ्यात 680 दशलक्ष घनफूटाची भर पडली असून आज सकाळी या धरणाचा पाणीसाठा 10 हजार 636 दशलक्ष घनफूट (40.91 टक्के) झाला आहे.


संगमनेर व अकोल्यासह सहा तालुक्यातील दुष्काळी भागांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरु असला तरीही त्याला फारसा जोर नसल्याने धरणसाठ्यात धिम्यागतीने वाढ होत होती. मात्र मंगळवारी सायंकाळपासून कळसूबाईच्या शिखरांवरील पावसालाही चांगलाच जोर चढला असून कृष्णवंती हंगामात पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे वाकी जवळील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या भिंतीवरुन कोसळणार्‍या प्रपातातही लक्षणीय वाढ झाली असून आज सकाळी या धरणाच्या भिंतीवरुन 789 क्यूसेक वेगाने रंधा धबधब्याच्या दिशेने पाणी वाहत होते, त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला हा धबधबाही आता आवेशात येवू लागला आहे. 24 तासांत निळवंडे धरणातही 321 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले असून धरणाचा एकूण पाणीसाठा 2 हजार 321 दशलक्ष घनफूट (27.90 टक्के) इतका झाला आहे.


तालुक्याच्या उत्तर-पूर्वकडील आढळा खोर्‍यात पावसाला फारसा जोर नसला तरीही संततधार कायम असल्याने आणि त्यातच या साखळीतील वरील भागात असलेले दोन्ही जलाशयं यापूर्वीच तुडूंब झाल्याने धरणातील पाण्याची आवक वाढली असून 24 तासांत या धरणात 31 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल होवून धरणसाठा 558 दशलक्ष घनफूटावर (52.64 टक्के) पोहोचला आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदला आहे. एकंदरीत प्रदीर्घ विश्रांतीनंतर पाणलोटात विसावलेल्या मान्सूनला मंगळवारपासून जोर चढल्याने जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याची जोरदार आवक सुरु झाली असून लाभक्षेत्रातही बहुतेक ठिकाणी भीज पाऊस सुरु असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी लाभक्षेत्रात झालेला पाऊस :
अकोले – 14.9 मि.मी.
संगमनेर – 6.7 मि.मी.
श्रीरामपूर – 1.7 मि.मी.
राहुरी – 1.6 मि.मी.
राहाता – 1.5 मि.मी.
नेवासा – 1.1 मि.मी.
कोपरगाव – 0.8 मि.मी

Visits: 50 Today: 1 Total: 79324

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *