जेव्हा, पोलिसांसमोरच बिबटे अवतरतात तेव्हा..! एकीकडे चोरट्यांचे तर दुसरीकडे बिबट्यांच्या भयाने पठारभाग थरथरला

नायक वृत्तसेवा, घारगाव
पहाटेची वेळ.. सर्वत्र नीरव शांतता पसरलेली.. अशातच नागरिकांची सुखाची झोप सूर्योदयापर्यंत कायम रहावी यासाठी कडाक्याच्या थंडीतही पोलीस गस्त घालीत होते. साकूरच्या बाजारपेठेतून पोलिसांचे वाहन घारगावच्या दिशेने निघाले आणि काही वेळातच जागीच स्तब्ध झाले. वाहनासमोर रेंगाळणारे पूर्णवाढ झालेले दोन बिबटे खाकीच्या मागे असलेल्या माणसांमध्ये थरथराट निर्माण करुन गेले, मात्र त्याचवेळी त्याच खाकीने कर्तव्याची जाणीवही करुन दिली आणि मग सुरु झाले शेतकर्‍यांना सावध करण्याचे कर्तव्य. या थरारक घटनेने चोरट्यांनी आधीच दहशत माजवलेल्या पठारावर आता बिबट्यांनी धडकी भरवली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आज (ता.5) पहाटेच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस काँस्टेबल किशोर लाड व चालक नामदेव बिरे हे दोघे सरकारी वाहनातून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित गस्त घालत होते. गेल्या काही दिवसांपासून पठारभागात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घातलेला असल्याने घारगाव पोलीस कमालीचे सावध झालेले आहेत. त्याचाच परिपाक अवघ्या 24 कर्मचार्‍यांसह लाखभर लोकांची सुरक्षितता कायम राखणार्‍या घारगाव पोलिसांना राद्धीची गस्तही घालणे क्रमप्राप्त झालेले.


त्यानुसार घारगाव पोलिसांच्या हद्दितील साकूरमध्ये गस्त घालून तेथील परिस्थिती सुरक्षित असल्याचे पाहून वरील दोघेही कर्मचारी पुन्हा घारगावच्या दिशेने निघाले. वाटेत लागलेल्या खंदरमाळ शिवारात पोलिसांचे वाहन येताच चालक बिरे यांनी करकचून ब्रेक लावले. एव्हाना पहाटेच्या झोंबणार्‍या गारव्यात थोडासा डोळा लागलेले पो.कॉ.लाड खडबडून जागे झाले व त्यांनी डोळे उघडीत काय रेऽ.. म्हणून चालकाकडे विचारणा केली असता, चालक बिरे यांची पाचवार धारणा बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाहनासमोरच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज बांधून लाड यांनीही जेव्हा समोर नजर फेकली तेव्हा काही काळ त्यांचीही भंबेरी उडाली होती.

मात्र लागलीच त्यांना आपल्या कर्तव्याचे स्मरण झाले. पहाटेची वेळ आहे, अनेक शेतकरी बांधव शेतात पिकांना पाणी भरीत असतील याची कल्पना असल्याने त्यांनी वाहनाचा सायरन वाजवला. सायरनचा आवाज ऐकताच भररस्त्यात रेंगाळणारे ते दोन्ही बिबटे दोन टप्पे मारीत बाजूच्या झुडपात अदृष्य झाले. खरेतर यावेळेपर्यंत या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांची भूमिका पूर्ण झालेली होती. मात्र त्यांच्या शरीरावरील खाकीने मानवी विचार बाजूला करुन त्यां दोघांमधील कर्तव्य जागे केले आणि त्यांनी घारगावकडे जाणारे आपले वाहन खंदरमाळ शिवारातील वाडीवस्त्यांवर फिरवून सायरनद्वारे नागरिकांना सावध करण्याचे काम केले.

त्यांनी योग्यवेळी निर्णय घेवून घारगावकडे जाण्याचे टाळून नागरिकांच्या, शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे भर वस्तीच्या ठिकाणी एकाचवेळी दोन बिबट्यांचा संचार असूनही या दोन्ही कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांच्याकडून कोणालाही इजा झाली नाही. किंबहुणा पोलीस वाहनाच्या सायरनमुळे नागरिक जागे होण्यासोबतच ते दोन्ही बिबटे दूर निघून गेल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. या दोन्ही कर्मचार्‍यांच्या समर्पित सेवेबद्दल खंदरमाळच्या ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले, तर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी त्या दोन्ही कर्मचार्‍यांचे विशेष कौतुकही केले.


सध्या पठार भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता बिबट्यांचे दर्शनही जोडीने होवू लागल्याने संपूर्ण पठारभागात दुहेरी भितीचे दृष्य दिसत आहे. नागरिकांच्या मनात सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी घारगाव पोलीस आपल्या परिने कर्तव्य बजावत आहेत. मात्र नागरिकांनीही रात्रीच्यावेळी शेताला पाणी भरण्यासाठी जाताना अधिक सावध राहण्याची गरज या प्रकारातून अधोरेखीत झाली आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 117243

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *