आरोग्याचे महत्त्व बालपणापासूनच कळणे आवश्यक ः डॉ. थोरात विद्याभवनमधील चिमुकल्यांशी डॉ. जयश्री थोरातांनी साधला संवाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर आरोग्याचे महत्त्व बालपणापासूनच कळले पाहिजे. सुदृढ, निरोगी बालकाबरोबर बुद्धिमत्तेने विकसित विद्यार्थी घडवण्यावर विद्याभवन शाळेने दिलेला भर हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
संगमनेरमधील अमृतनगर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात प्राथमिक विद्याभवनने आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. तर व्यासपीठावर उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, शरद गुंजाळ, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, संदीप दिघे, अशोक कवडे यांच्यासह सांस्कृतिक मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. सर्व शाळांमधून इंग्रजी व विज्ञानावर विशेष भर दिला जात असून हाच पॅटर्न विद्याभवन शाळेने सुद्धा राबवला आहे. सातत्याने विविध उपक्रमांबरोबर विद्यार्थ्यांसाठी आरोग्याचे दिले जाणारे शिक्षण हे अत्यंत कौतुकास्पद आहे. कारखान्याच्या माध्यमातून सांस्कृतिक मंडळाने विद्याभवन हे विद्यालय सुरू केले असून यामधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशात व परदेशात कार्यरत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच या संस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ म्हणाले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना आंबरे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका संगीता म्हस्के यांनी केले तर रामदास तांबडे यांनी आभार मानले.