पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागले आम्ही कसं जगायचं? वर्षापूर्वी माहुली येथील पानटपरी जळालेल्या मालकाने मांडली व्यथा..

नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने पानटपरी पेटवून दिली होती. त्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी असलेले साधन उध्वस्त झाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कसेबसे सावरुन पुन्हा नवीन टपरी बनवून संसाराचा गाडा चालू केला. मात्र, आता पुन्हा ‘मिनी लॉकडाऊन’ झाल्याने टपरी बंद करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. यामुळे आम्ही कसं जगायचं? अशी हतबलता संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माहुली येथील दुकानदार विठ्ठल दुलबा गाडेकर यांनी मांडली आहे.

खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या खालची माहुली येथे विठ्ठल गाडेकर वास्तव्यास आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेलाच त्यांची पानटपरी व छोटेसे हॉटेल आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे दुकानदार गाडेकर यांना आपली पानटपरी बंद करावी लागली होती. त्या दरम्यान 28 मार्च, 2020 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञाताने त्यांची पानटपरी पेटवली होती. काही क्षणातच आगीने रुद्रावतार धारण केल्याने संपूर्ण टपरी जळून खाक झाली होती. यामध्ये सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेला आता एक वर्ष लोटले आहे.

तत्पूर्वी या संकटातून सावरुन गाडेकर यांनी पुन्हा नवीन टपरी बनवली आणि आपला व्यवसाय सुरू केला. कुठेतरी सुरळीत चालू होण्यास सुरुवात झाली असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने ‘मिनी लॉकडाऊन’ केले आहे. त्यामुळे पुन्हा टपरी बंद करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. यामुळे आता कसं जगायचं असा उद्विग्न सवाल गाडेकर यांनी मायबाप सरकारला केला आहे. दरम्यान, मागील वर्षाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गाडेकर व त्यांचा मुलगा अमित हे दोघे येथेच रात्रीच्या वेळेस झोपतात. कोरोना संकटाने आधीच खूप नुकसान केले आहे. त्यात पुन्हा कोरोनाने थैमान घातल्याने कधी हे संकट संपेल या विवंचनेने ते पूर्णतः खचले आहेत.
