शिवस्मारकावरुन दोन आमदारांमध्ये रंगला श्रेयवादाचा सोहळा! भव्य-दिव्य पुतळ्याचे आश्‍वासन; महामंडळाकडून मात्र अवघी अडीचशे चौरस फूट जागा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
इतिहासात डोकावताना छत्रपती शिवरायांचा संगमनेरच्या भूमीला पदस्पर्श लाभल्याचा दाखला मिळतो. त्यामुळे शहराच्या मध्यभागी त्यांना साजेशे स्मारक व्हावे अशी शिवप्रेमींची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या अनुषंगाने आघाडी सरकारच्या काळात पालिकेकडून जागेची मागणी करणारा ठरावही सादर करण्यात आला होता. मात्र या ठरावाला महायुती सरकारच्या काळात मंजुरी मिळून तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवस्मारकासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणाही केली होती. त्या उपरांतही शहरातील शिवस्मारकाबाबत फारशा हालचाली झाल्याचे दिसत नसतानाच बुधवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे व विधानसभेचे सदस्य आमदार अमोल खताळ यांच्याकडून वर्षभरातच स्मारक पूर्ण करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. त्यावरुन संगमनेरच्या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाचा सोहळा रंगल्याची जोरदार चर्चा संगमनेरात सुरु झाली आहे.


संगमनेरातील शिवप्रेमींच्या मागणीनुसार संगमनेर नगरपरिषदेने 3 जून 2019 रोजी सभागृहात प्रस्ताव मांडून बसस्थानकाच्या आवारात राज्य परिवहन महामंडळाची जागा मिळावी यासाठी जागेची मागणी करणारा ठराव केला होता. त्यात स्थानकाच्या प्रवेशद्वारातील दर्शनी भागात साधारणतः दोन हजार चौरस फूट जागा मिळावी अशी मागणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखल झालेल्या या प्रस्तावानुसार जागा देण्याच्या मागणीला प्रत्यक्षात मात्र महायुती सरकारच्या काळात 21 ऑगस्ट 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. त्यासाठी पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र परिवहन महामंडळाने सदरचा प्रस्ताव मंजुर करताना प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारातील अवघी 4 मीटर बाय सहा मीटर जागा देण्याची तयारी दाखवल्याने एव्हढ्याशा जागेत ‘स्मारक’ कसे उभारले जाईल असा प्रश्‍न निर्माण झाला.


दरम्यानच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शहरातील एका कार्यक्रमात शिवस्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यासर्व घडामोडींना एक ते दीड वर्षाचा कालावधी उलटलेला असताना प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नसल्याने शिवप्रेमींमध्ये अस्वस्थता असताना विधानसभा निवडणुकीत संगमनेरकरांनी परिवर्तन घडवले. त्यातून राज्यात महायुतीने प्रचंड बहुमत प्राप्त करुन सत्ता स्थापन केल्याने संगमनेरच्या शिवप्रेमींची इच्छा लवकर पूर्ण होईल असे चित्र निर्माण झालेले असताना शहरातील प्रत्येक विकास कामात पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्यात श्रेयवाद रंगू लागला. शासनाकडून मंजुर झालेल्या प्रत्येक निधीचे श्रेय लाटण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये स्पर्धा लागलेली असताना बुधवारी (ता.19) शिवजयंतीच्या दिनी त्यात संगमनेरच्या शिवस्मारकाचीही भर पडली.


यावेळी आमदार अमोल खताळ यांनी बसस्थानक परिसरात आयोजित शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्‍वारुढ प्रतिमा असलेले स्मारक पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली. त्यासाठी आवश्यक असलेला एककोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाने मंजुरी केल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच अमृत उद्योग समूहातील सोहळ्यातून पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनीही आपल्या पाठपुराव्यातून जागा आणि निधी मिळाल्याचे सांगत पुढच्या वर्षीची शिवजयंती अश्‍वारुढ प्रतिमेसह साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. या स्मारकासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले हे तारीखवार सांगण्यासही आमदार तांबे विसरले नाहीत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकासमोर भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


एकंदरीत संगमनेरच्या शिवस्मारकाचा प्रवास लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारच्या काळात धुळ साचलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या प्रस्तावावर महायुती सरकाकडून निर्णय झाला. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची जागाही महायुती सरकारनेच दिली आणि आता स्मारकासाठी आवश्यक असलेला एक कोटी रुपयांचा निधीही महायुती सरकारकडूनच दिला जाणार आहे. मात्र या सर्व गोष्टी आपल्याच पाठपुराव्यातून झाल्याचे सांगण्याची शर्यत लागल्याने संगमनेरात शिवस्मारकाचा अद्याप कोणताही थांगपत्ता नसताना दोघा लोकप्रतिनिधींमध्ये त्यावरुन श्रेयवादाचा सोहळा रंगला असून त्यासाठी दोघांनीही शिवजयंतीचा मुहूर्त साधल्याचीही जोरदार चर्चा शहरात सुरु झाली आहे.

Visits: 307 Today: 3 Total: 1104896

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *