‘टाळे ठोको’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! : आ.विखे ऊर्जामंत्र्यांची शंभर यूनिट मोफत वीज देण्याची घोषणा फसवी निघाल्याचा केला घणाघात

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्य सरकारने थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात सर्व वीज ग्राहक आणि शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे. राज्यातील 72 लाख वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या या जुलमी निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार विखे-पाटील पुढे म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिलांची वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करु देणार नाही. भाजपाचे सर्व कार्यकर्ते व वीज ग्राहक शेतकरी येत्या शुक्रवारी (ता.5) सकाळी 10 वाजता रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाद्वारे गावपातळीवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाना टाळे ठोकण्यासह, विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी येणार्या महावितरणच्या कर्मचार्यांनाही अटकाव केला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना शेतकर्यांना कधीही वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही व वीज ग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही. उलट वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिकाच भाजपा सरकारने घेतली होती. थकबाकी वाढली तरी तो अर्थिक भार राज्य सरकारने स्वतावर घेतला. कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. वीज कंपन्यांची परिस्थिती सुध्दा चांगली होती. पण आघाडी सरकार सतेवर आल्यानंतर नेमकी वीज वितरण कंपन्यांची परीस्थीती कशी बिघडली? असा सवालही आमदार विखे यांनी उपस्थित केला.

कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या मानसिकतेत नसल्याकडे लक्ष वेधून आमदार विखे म्हणाले की, अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची महाविकास आघाडी सरकारची घोषणाही प्रत्यक्षात उतरली नाही. यापूर्वी ग्राहकांना आलेल्या जादा रकमेच्या बिलांची होळी करुन आम्ही सरकारला इशारा दिला होता. याची आठवण करुन देतांना, कोरोना प्रसारापूर्वी राज्य सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील जनतेला शंभर यूनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजवर ते पाळले गेले नसल्याने ती घोषणा फसवी असल्याचेही स्पष्ट झाल्याचा आरोप करीत आमदार विखे-पाटील यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून ऊर्जामंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची पूर्तता करण्यास भाग पाडणार असल्याचे सांगीतले.

