कुख्यात गुंड पाप्या शेख टोळीविरुद्ध ‘मोक्का’! उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके करणार अधिक तपास


नायक वृत्तसेवा, शिर्डी
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना देखील साथीदारांना संपर्क करून शस्त्रविक्रीचे रॅकेट चालविणार्‍या शिर्डी येथील कुख्यात गुंड पाप्या शेख व त्याच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून प्रस्ताव पाठविला होता.

टोळीप्रमुख सलीम उर्फ पाप्या ख्वॉजा शेख (रा. कालिकानगर, शिर्डी, ता. राहाता), टोळी सदस्य दत्तात्रय सुरेश डहाळे (वय 34, रा. श्रीरामनगर, शिर्डी), सुलतान फत्तेमोहंमद शेख (वय 29, रा. महलगल्ली, बेलापूर बु., ता. श्रीरामपूर), रवी राजेंद्र बनसोडे (वय 22, रा. गायकवाड वस्ती, शिर्डी), राहुल सिंग (रा. उमटी, मध्यप्रदेश), तन्वीर मोहंमद हानिफ रंगरेज (रा. कोपरगाव), जेल पोलीस गणेशसिंग विठ्ठलसिंग तौर (वय 50, रा. गावडे कॉलनी, टेल्को कंपनी समोर, चिंचवड पुणे), कुमार जगन्नाथ खेत्री (रा. पाटबंधारे कॉलनी मागे, ता. ताकारी वाळवा, जि. सांगली) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पाप्या शेख याला शिर्डी पोलीस ठाण्यातील 2011 मध्ये दाखल गुन्ह्यात मोक्का कायदा कलमान्वये विशेष न्यायाधीश, मोक्का न्यायालय नाशिक यांनी शिक्षा ठोठावली होती. तो सध्या येरवडा कारागृह पुणे येथे शिक्षा भोगत आहे. कारागृहात शिक्षा भोगत असतानाही त्याने त्याच्या साथीदारांशी संपर्क करून नवीन टोळी तयार केली होती. त्या टोळीने मध्य प्रदेशातून गावठी कट्टे व जिवंत काडतुसे श्रीरामपूर शहरात आणली होती. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि 384, 385, 120 (ब), 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 27 अन्वये गुन्हा दाखल आहे.

या दाखल गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत असताना टोळीप्रमुख पाप्या शेख याच्याविरूध्द 37 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या टोळी साथीदारांवर देखील गुन्हे दाखल असल्याचे दिसून आलेले आहे. तसेच पाप्या शेख हा मोक्काच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना देखील त्याने सात जणांची टोळी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गावठी कट्टेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) हे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळण्याबाबत निरीक्षक आहेर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. नमूद प्रस्तावाचे व कागदपत्रांचे अवलोकन होवून महानिरीक्षक शेखर यांनी टोळी प्रमुख सलीम उर्फ पाप्या शेख व टोळी सदस्यांविरूध्द ‘मोक्का’ हे वाढीव कलम लावण्याची मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे दिला आहे.

Visits: 154 Today: 1 Total: 1113662

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *