मोबाईल लसीकरण केंद्र सुरू करण्याची भाजपची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्व नागरिकांना लस सहजतेने मिळावी यासाठी व्हॅनद्वारे घरोघरी लसीकरण करावे, अशी मागणी उत्तर नगर जिल्हा भाजपतर्फे संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर तथा ग्रामीण भागात तसेच अकोले तालुक्यात शासकीय व खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र चालू आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण लवकरच सुरू झाले आहे. सध्याची आपल्या लसीकरण केंद्रांची परिस्थिती लक्षात घेता आपल्या लसीकरण केंद्रांवर अतिरिक्त ताण पडेल व सर्वांना लसीकरण करताना मोठा गोंधळ उडण्याची तथा मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता शहरात तथा ग्रामीण भागात काही मोबाईल व्हॅन सुरु कराव्यात. ज्यामुळे आरोग्य कर्मचार्यांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल आणि ज्यांना काही अपरिहार्य परिस्थितीमुळे केंद्रापर्यंत जाऊन लस घेणे शक्य नाही त्यांना लस घेणे सोयीस्कर होईल. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी व लसीकरण केंद्र हे एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून उभारावेत ज्यामुळे गर्दी कमी होऊन संसर्ग कमी होण्यास मदत होईल. या निवेदनाद्वारे भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, ओबीसी आघाडी जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, जिल्हा वरीष्ठ नागरिक सेल प्रमुख शिवाजी लष्करे, जिल्हा अल्पसंख्य आघाडी प्रमुख असीफ पठाण, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा रेश्मा खांडरे यांनी मागणी केली आहे.