जिल्ह्याला मिळाला साडेतीन महिन्यातील पहिला सुखद धक्का! एकूण रुग्णसंख्या तीनशेच्या आसपास; संगमनेर तालुक्यातील सरासरीही ओसरली
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या रुग्णसंख्येच्या चढ-उतारानंतर आज अत्यंत दिलासादायक अहवाल हाती आहेत. आजच्या एकूण अहवालातून जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत कमालीची घट नोंदविली गेली असून अवध्या 309 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच संगमनेर तालुक्यात सुरु असलेली रुग्णसंख्येची घसरणही कायम असून आज शहरातील अवध्या चार जणांसह तालुक्यातील 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 580 झाली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 205 रुग्णांवर उपचार सुरु असून शासकीय नोंदी नुसार आत्तापर्यंत 103 जणांचा बळी गेला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत एकसारखी घसरण होत असतांना अधुनमधून काही तालुक्यातील रुग्णसंख्येचे आकडे वाढीव येत असल्याने काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील संक्रमण भरात असतांना खासगी कोविड आरोग्य केंद्रांसह जिल्हा रुग्णालयाकडून राष्ट्रीय कोविड पोर्टलवर प्रलंबित राहिलेल्या नोंदींमुळे अचानक काही तालुक्यातील रुग्णसंख्या व मयतांची संख्या वाढत असल्याचेही त्यातून समोर आले होते. याबाबत शुक्रवारी (ता.18) दैनिक नायकने याविषयावर सविस्तर वृत्तही प्रसिद्ध केले होते. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील कोविडची दुसरी लाट जवळपास ओसरल्याचे दिलासादायक चित्र कायम असून अचानक एखाद्या दिवशी समोर येणारी वाढीव संख्या प्रलंबित अहवालांमधील असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्याची रुग्णसंख्या घसरणीला असतांना संगमनेर तालुक्यातून मात्र दररोज जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण समोर येत असल्याने तालुक्यात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील कोविडचे संक्रमणही आटोक्यात आले असून आज 18 मार्चनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या 20 पेक्षा खाली आली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 175 गावे व वाड्या-वस्त्यांपर्यंत कोविडचा संसर्ग पोहोचला व त्यातून 22 हजार 580 रुग्णांना लागण झाली. त्यातील 22 हजार 272 रुग्णांनी उपचार पूर्ण केले, 205 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर दुर्दैवाने 103 जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या 16 महिन्याच्या कोविड काळात तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी 5 हजार 53 रुग्ण शहरी तर 17 हजार 527 रुग्ण ग्रामीण भागातील होते. या कालावधीत शहरातील 24 तर ग्रामीण भागातील 79 जणांनी आपला जीवही गमावला.
मात्र सध्या तालुक्यात समाधानाचे चित्र होवू लागले असून सलग दोन महिने रुग्णसंख्येचे डोंगर पाहणार्या संगमनेरकरांना दिलासा मिळू लागला आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील बाधीत गावांमधील 108 गावांमध्ये रुग्णसंख्या शून्य झाली आहे तर 49 गावांमध्ये पाच पेक्षाही कमी रुग्ण आहेत. सहा ते दहा रुग्ण असलेल्या गावांची संख्याही अवघी चार असून 10 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या गावांची एकूण संख्याही केवळ तीन आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड नियमांचे पालन केल्यास येत्या काही दिवसांतच संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट पूर्णतः ओसरण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या तीन, खासगी प्रयोगशाळेच्या चार व रॅपिड अँटीजेनच्या अकरा निष्कर्षातून संगमनेर शहरातील अवघ्या चौघांसह तालुक्यातील अठरा जणांना कोविडची बाधा झाली आहे. त्यात शहरातील भारत नगर येथील 34 वर्षीय महिलेसह संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 व 26 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील बारा गावे व वाड्या-वस्त्या मिळून चौदा जणांना कोविडचे संक्रमण झाले असून त्यात पिंपळगाव निपाणी येथील 48 वर्षीय महिला, साकूर येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सांगवी येथील 62 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 30 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 51 वर्षीय इसम, आश्वी बु. येथील 20 वर्षीय तरुणी, आश्वी खुर्द येथील सहावर्षीय बालिका, ओझर बु. येथील 30 व 28 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 69 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 36 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 52 वर्षीय इसम व पानोडी येथील 35 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुणाचा संक्रमितांच्या यादीत समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 580 झाली असून आजच्या स्थितीत तालुक्यातील 205 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रुग्णसंख्या 40 पेक्षा कमी आहे. आजच्या अहवालातून सर्वाधिक 38 रुग्ण शेवगाव तालुक्यातून तर पारनेर 37, जामखेड 30, पाथर्डी 29, श्रीरामपूर 27, राहुरी 21, श्रीगोंदा 20, नेवासा व संगमनेर प्रत्येकी 18, राहाता 14, कोपरगाव 13, अकोले व कर्जत प्रत्येकी 12, नगर ग्रामीण 8, इतर जिल्ह्यातील सहा, अहमदनगर महापालिका क्षेत्र पाच व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 75 हजार 488 झाली आहे.