संगमनेरच्या कोविड रुग्णसंख्येचा आलेख अद्यापही हलताच! किंचितसा हलगर्जीपणाही अंगलट आल्याने मंगळवारी रुग्णसंख्येची उसळी
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेली दहा महिने रुग्णसंख्येचे एकामागून एक विक्रम नोंदविणार्या कोविडचा संगमनेर तालुक्यातील प्रभाव मोठ्या प्रमाणात खालावल्याचे चित्र नूतन वर्षाच्या पहिल्या महिन्यात दिसले. मात्र या महामारीचे संक्रमण अद्यापही कायम असल्याचे वास्तवही त्यातून समोर आले. कोविड संपला असं समजून ‘बिनधास्त’ वावरणार्यांना आणि कोविडच्या नियमांप्रती किंचितसा हलगर्जीपणा दाखवणार्यांना त्याचा फटका बसला. गेला महिनाभर एकेरीच्या खाली असलेल्या तालुक्याच्या रुग्णगतीने मंगळवारी काहीशी उसळी घेत थेट 23 जणांना बाधा केली. त्यामुळे सरकारी गोंधळातून एकूण रुग्णसंख्येचा 6 हजार 339 हा नवीन आकडाही समोर आला. कोविडवरील लस उपलब्ध झालीय, मात्र सामान्यजणांना अद्यापही ती उपलब्ध झालेली नाही, आणि पुढील काही महिने तशी शक्यताही नसल्याने ‘कोविड आहे’ याचे स्मरण ठेवून नियमांचे काटेकोर पालन हिच आपली सुरक्षितता असल्याचे स्मरणही नागरिकांना ठेवावे लागणार हे अचानक वाढलेल्या रुग्णवाढीने अधोरेखीत केले आहे.

दैनिक नायकच्या मंगळवारच्या अंकात नूतन वर्षातील जानेवारी महिन्यात तालुक्यातील कोविडचा प्रभाव कसा खालावत गेला याचे विस्तृत विश्लेषण वाचकांसमोर मांडले होते. पण, त्याचवेळी ‘कोविडवरील लस तयारी झाली आहे, सामान्यांसाठी उपलब्ध नाही’. त्यामुळे प्रत्येकाने कोविडबाबत शासन व प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यात थोडासाही हलगर्जीपणा आपणास थेट रुग्णालयात दाखल करु शकतो हे मंगळवारच्या रुग्णवाढीने दाखवून दिले आहे. काल समोर आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील आठ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आजच्या स्थितीत कोविड केवळ वयस्करांनाच होतो हा गैरसमज असल्याचेही स्पष्ट झाले. मंगळवारी बाधा झालेल्यांमध्ये पन्नास पेक्षा अधिक वयाचे केवळ आठ तर तीसपेक्षा कमी वयाचेही तितकेच रुग्ण आहेत, उर्वरीत रुग्ण या दरम्यानचे आहेत.

मंगळवारी (ता.2) समोर आलेल्या शहरातील आठ रुग्णांमध्ये परदेशपुरा परिसरातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 वर्षीय महिला, नेहरु चौकातील 55 वर्षीय इसम, रंगारगल्लीतील 45 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय तरुण, माळीवाड्यातील 70 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 49 वर्षीय इसम आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 43 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील 40 वर्षीय तरुण, साकूर येथील 54 वर्षीय इसम, गुंजाळवाडी येथील 59 वर्षीय इसम व गोल्डन सिटीतील 40 वर्षीय तरुण, चिखली येथील 46 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 25 वर्षीय महिला, निमोण येथील 52 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 26 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्दमधील 30 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 20 वर्षीय महिला, वाघापूर येथील 28 वर्षीय तरुण, राजापूर येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 46 वर्षीय इसम व कोकणगाव येथील 18 वर्षीय तरुण अशा एकूण 23 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले.

गेल्या डिसेंबरमध्ये तालुक्यातील रुग्णवाढीचा सरासरी दर 26.32 इतका होता. या गतीने डिसेंबरमध्ये तालुक्याच्या रुग्णसंख्येत एकूण 816 रुग्णांची भर पडली होती. नूतन वर्षातील जानेवारीमध्ये हिच सरासरी राहील असा अंदाज असतांना कोविडने मात्र आश्चर्यकारक माघार घेतल्याचे चित्र दिसले. जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांत दररोज सरासरी 12.6 रुग्ण या गतीने 126 (शहरी 40), दुसर्या दहा दिवसांत 7.3 रुग्णगतीने 73 (शहरी 10) व शेवटच्या अकरा दिवसांत अवघ्या 3.82 या सरासरीने 42 (शहरी 23) अशा एकूण 241 रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे सुरुवातीचा अपवाद वगळता उर्वरीत कालावधीत मोठी रुग्णसंख्या समोर येणार्या तालुक्याच्या ग्रामीणभागातील रुग्णगतीही जानेवारीत अवघ्या 5.42 टक्क्यांवर आल्याने व याच महिन्यात तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकाही विक्रमी मतदानासह पार पडल्याने तालुक्याने कोविडचा पराभव केल्याचे दिलासादायक चित्र दिसत होते. मात्र मंगळवारी अचानक रुग्णवाढ झाल्याने पुन्हा काहीशी धाकधूक वाढली आहे.

