धनंजय मुंडे हे पराक्रमी योद्धा आहेत का? भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा तिरकस सवाल
नायक वृत्तसेवा, नगर
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढे नवी अडचण उभी राहिल्यानंतर भूमाता ब्रिगेड संघटनेच्या तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता त्यांचे सत्कार करणार्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसवरही देसाई यांनी टीका केली आहे. ‘मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का,’ असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ‘परिवार संवाद कार्यक्रम घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का तेही पहावे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने मुंडे यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. त्यावरून राज्यभर रान पेटले होते. त्यावेळी तृप्ती देसाई यांनीही मुंडेंवर टीका केली होती. मात्र, काही काळानंतर सदर महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार होऊ लागले. आता दुसर्या महिलेने मुंडे यांच्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. हा धागा पकडून देसाई यांनी पुन्हा मुंडे यांच्यावर आणि सोबत मुंडे यांचा सत्कार करणार्यांवर टीका केली आहे.
‘मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत. मुंडे हे पराक्रमी योद्धा आहेत, अशा पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. परंतु, त्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले आहेत याची कबुली स्वतःच दिलेली होती. त्यानंतरही तक्रार करणार्या महिलेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकरवी झाला होता. आता पुन्हा दुसर्या महिलेने तक्रार अर्ज दिला आहे. त्यामुळे मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करणारे आणि मोठमोठे सत्कार करणार्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. असेच चालू राहिले तर भविष्यात एखादा नेता वा मंत्र्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर वा तो आरोपी ठरल्यानंतरही त्याचं स्वागत केलं जाईल’, अशा शब्दांत देसाई यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी परिवार संवाद साधताना, राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांचे परिवार सुरक्षित आहेत का, हे पण पाहिले पाहिजे आणि त्याविरोधात राष्ट्रवादीतील सर्व महिला नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.