संगमनेरच्या ‘वैभवशाली’ बसस्थानकात महिनाभरात चौथ्या भिक्षेकर्‍याचा मृत्यू! ‘लॉकडाऊन’चा आधार घेवून अनेक अनोळखींनी बस्तान बांधल्याने रात्री येथे चालतात गैरकृत्य


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधुनिक बसस्थानकांच्या पंक्तित अग्रभागी असलेले संगमनेर बसस्थानक आपल्या भव्यदिव्य आणि देखण्या रचनेमुळे निश्चितच शहराच्या वैभवात भर घालीत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या या वास्तुत मात्र गेल्या काही दिवसांपासून भिक्षेकर्‍यांचे जीव जाऊ लागले आहेत, त्यामुळे वैभवशाली असं बिरुदं मिरवणारी ही वास्तू शापित भासू लागली आहे. अलिकडच्या काळात आत्तापर्यंत या परिसरात तब्बल चौघांनी जीव त्यागल्याने अनेक भिक्षेकर्‍यांना हक्काचा आश्रय देणार्‍या या स्थानकाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याचे समृद्ध झालेल्या संगमनेर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील भरभराटीला आलेली बाजारपेठ, त्यातून फुललेले उद्योग-व्यवसाय यामुळे जिल्ह्यातील आघाडीचे शहर म्हणून संगमनेरचा उल्लेख होतो. मागील कालखंडात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून प्रशासकीय भवन, पालिकेच्या कार्यालयाची मुख्य इमारत, पंचायत समिती, तहसील व पोलीस कार्यालय आणि संगमनेर बसस्थानकाची देखणी नूतन इमारत उभी राहिली. यातील पंचायत समिती आणि संगमनेर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत वगळता उर्वरीत सर्व नूतन वास्तुंची आजची अवस्था अत्यंत गलिच्छ असल्याचे दिसून येते.

साधारणतः वर्ष भरापूर्वी संगमनेर बसस्थानकाच्या नूतन इमारतीचेही काम पूर्ण झाल्याने ते सुरू करण्यात आले. प्रशस्त आवार, एकाच रेषेत अनेक फलाट, दोन मजली व्यापारी संकुल, दत्तात्रयांचे देखणे मंदीर आणि तांत्रिक कार्यशाळेला चढलेला आधुनिकतेचा साज यामुळे या बसस्थानकाची चर्चा अवघ्या जिल्ह्यात आहे. मात्र वर्षभरातच बसस्थानकाची नूतन इमारत म्हणजे भिक्षेकरी आणि बेवारसांसाठी ‘धर्मशाळा’ ठरल्याने आजच्या स्थितीत या परिसरात पन्नासाहून अधिक भिक्षेकर्‍यांचे हक्काच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणूनही पुढे आले आहे. अर्थात निराधार असलेल्या व येथे आश्रय घेणार्‍यांच्या विरोध करण्यासाठी हा प्रपंच नसून त्यांचीही सोय व्हावी अशी मानवतेची भूमिकाही त्यामागे आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणताही मापदंड नसल्याने येथे येणार्‍या आणि जाणार्‍यांबाबत कोणतेही गांभीर्य पाळले जात नाही.

24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी गरजू, निराधार व भिक्षेकर्‍यांसाठी अन्नदानाची व्यवस्थाही सुरु केली. त्यामुळे बसस्थानकावरील दत्त मंदिराच्या परिसरात अशा नागरिकांना दररोज दोनवेळचे जेवन पोहोचते करण्याची पद्धत सुरु झाली. त्यातून येथील भिक्षेकर्‍यांची संख्या वाढण्यासोबतच वाटसरु व परिस्थितीचा फायदा घेणार्‍यांचीही येथील संख्या वाढली आहे. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू होवून जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत अचानक वाढलेली येथील कथित निराधारांची संख्या मात्र कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने एकप्रकारे येथे सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

महिन्याभरात या परिसरात वास्तव्यास असलेल्या चौघांनी बेवारस स्थितीत जीव त्यागला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून यंत्रणांना वेळीच माहिती देवूनही त्यांच्याकडून मदत मिळण्यास दरवेळी विलंब झाल्याने संगमनेरी यूथ सोशल फौंडेशनसारख्या संस्थांनाच शासकीय यंत्रणांचे काम करण्याची पाळी आल्याचेही काही दाखले आहेत. मंगळवारी सकाळीही अशाच एका दिव्यांग असलेल्या निराधाराचा मृतदेह येथे आढळून आला. बांधकाम सभापती किशोर टोकसे, नगरसेवक किशोर पवार यांच्या सहकार्याने संस्थेचे अध्यक्ष कार्तिक जाधव, प्रथमेश सातपुते, आनंद बनभेरु, मयूर दुर्गुडे, वैभव मोंढे व भूषण झांबरे आदिंनी त्याला ग्रामीण रुग्णालय व नंतर पालिकेच्या शवविच्छेदन गृहात पोहोचवले. बेवारस पद्धतीने बसस्थानकाच्या परिसरात जीव गमावणारी ही व्यक्ती गेल्या पंधरा दिवसातील तिसरी तर महिन्याभरातील चौथी आहे.

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात तात्पूरता आश्रय घेणार्‍या अनेकांनी दोनवेळेचे जागीच मिळत असल्याने येथेच मुक्काम ठोकला आहे. यातील गरजू, दिव्यांग व निराधारांचे ठिक आहे, पण त्यांच्या आडून काही धडधाकटांचीही गर्दी असल्याने त्यांची चौकशी होवून त्यांना पुढील दिशा दाखवण्याची गरज आहे. या गर्दीत काही अपप्रवृत्तीचाही शिरकाव असल्याने रात्रीच्यावेळी या गर्दीतून गैरप्रकारही घडत असल्याची माहिती आहे. गेल्या पंधरवड्यात भिक्षेकर्‍यांच्या दोन भिन्न टोळ्यांची एकमेकांशी हाणामारी झाल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देवून येथील भिक्षेकर्‍यांची सत्तयता तपासण्याची गरज आहे, अन्यथा वैभवशाली ठरलेली ही इमारत गुंडगिरी आणि अवैध व्यवसायाचा अड्डा बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Visits: 83 Today: 1 Total: 1110141

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *