बटाटा पिकाला फळधारणा झाली नसल्याने ब्राह्मणवाडा परिसरातील शेतकरी चिंतातूर

बटाटा पिकाला फळधारणा झाली नसल्याने ब्राह्मणवाडा परिसरातील शेतकरी चिंतातूर
बटाट्यासह खरीप पिकांनाही बसला मोठा फटका; अपेक्षित नुकसान भरपाईची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसर बटाटा पिकाचे पारंपारिक आगार समजला जातो. परिसरातील शेतकर्‍यांना बटाटा पिकाचे चांगले तंत्र अवगत झालेले आहे. मात्र यंदा बटाटा, भुईमुग, सोयाबीन या खरीप पिकांची वाढ जोमदार झालेली असली तरी फळधारणा झाली नसल्याने परिसरातील शेतकरी चिंतातूर असून शासनाने डोळसपणे पीक परिस्थिती पहावी आणि शेतकर्‍यांना अपेक्षित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ब्राह्मणवाडा, करंडी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.


ब्राह्मणवाडा परिसरात यंदा बटाटा लागवडीत प्रचंड घट झाली आहे. केवळ तीस टक्के शेतकर्‍यांनीच बटाटा लागवड केली आहे. त्यात ज्योती, पूखराज व 3494 या वाणांची लागवड झाली. लागवडी पूर्वी पहिले वादळ झाले. लागवडीच्या वेळी पुरेशी ओल नव्हती. लागवडीनंतर पाऊस कमी झाला. दरम्यानच्या काळात उष्णता वाढत गेली. या पिकाला पोषक अशी थंडी मिळाली नाही आणि नंतर लाल करपा व काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बटाटा, भुईमुग, सोयाबीन या पिकांची वाढ झाली पण फळधारणा झाली नाही. यावर्षीच्या हवामान परिणामामुळे बटाट्यासह खरीप पिकांना मोठा फटका बसणार असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत.


खरीपातील बटाटा पीक दोन-सव्वा दोन महिन्यांत येत असते. शेतकरी वातावरण व पाऊस यांचा विचार न करता लागवड करण्याची अलिकडच्या तीन-चार वर्षांत घाई करताना दिसत आहेत. काही शेतकरी तर अगदी वळीवाच्या पावसावर देखील बटाटा लागवड करु लागले आहेत. याचा परिणाम या पिकाच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. ज्या शेतकर्‍यांनी उशिरा लागवड केली त्यांची बटाटा पिके चांगली आहेत. ज्योती पिकास साठ ते सत्तर दिवस, पुखराज पिकास नव्वद दिवस त्र-3494 पिकास नव्वद दिवस लागतात. लेट लागवड झालेल्या बटाटा पिकांना अजून वीस ते पंचवीस दिवस अवकाश आहे. खरीपाची पिके येणार असली तरी उत्पादनात प्रचंड घट होणार असून शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही मिळतो की नाही अशी शंका आहे. दोन ते अडीच महिने होऊनही करंडी गावातील बटाटा पिकाची पाहणी करत असताना बटाटा पिकाला एकही बटाटा आलेला दिसला नाही केवळ मुळ्याच दिसल्या हे पाहून सर्व शेतकरी आश्चर्यचकित झाले. गावातील सर्वच शेतकर्‍यांच्या बटाटा पिकाची अवस्था सारखीच असल्याने सर्व शेतकरी चिंतेत आहेत. याबाबत ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच भारत आरोटे, श्रीकृष्ण दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक संचालक गोकुळ आरोटे, व्यापारी कमलेश गांधी यांनी खरीप पिकांची वाढ होऊन फळधारणा झाली नाही हा हवामानाचा परिणाम असल्याचे सांगून शासनाने बटाटा या खरीप पिकाला विमा संरक्षण तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक पॅकेज मिळावे, अशी मागणी केली आहे.


लोकांकडून हातउसणे पैसे घेऊन बटाटा बियाणे 2200 ते 2600 रुपये प्रतीक्विंटलने 25 क्विंटल बटाटे लागवड केली. बियाणे, खते-औषधे, मजूर इत्यादी भांडवल असा जवळ-जवळ 70 हजार रुपये एवढा खर्च झाला. येत्या दहा-पंधरा दिवसांत बटाटा काढणीला येईल. परंतु झाडाला बटाटे न आल्याने आम्ही शेतकरी खूप चिंतेत आहोत. घेतलेलं कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न आम्हा शेतकर्‍यांपुढे आहे. त्यामुळे शासनाने आम्हांला मदत करावी.
– संतोष किसन गोंदके (बटाटा उत्पादक)

जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकरी राजाची अवस्था खूप वाईट आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे सर्वत्र शेतकरी राजा उद्ध्वस्त झाला आहे. सद्यस्थितीत शेतकरी राजाच्या बटाटा पिकाचे खूप नुकसान झालं आहे. तरी शेतकर्‍याला लवकरात लवकर मायबाप सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. तसेच बटाटा पिकासाठी विमा संरक्षण मिळावे.
– चंद्रकांत गोंदके (सरपंच, करंडी)

Visits: 17 Today: 1 Total: 115789

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *