कुटे हॉस्पिटलमध्ये गुडघ्यावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय दुर्मिळ अशा गुडघ्यातील वाटीच्या दोरीच्या जखमेवर संगमनेरातील कुटे हॉस्पिटलमध्ये डॉ.सौरभ पगडाल यांनी ऑर्थोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती कुटे हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रदीप कुटे यांनी दिली आहे.
याबाबत डॉ.कुटे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नांदूर शिंगोटे येथील 50 वर्षीय शेतकर्याचा दुचाकी अपघात होवून गुडघा अक्षरशः जायबंदी झाला होता. यामुळे पाय गुडघ्यात वाकेनासा होवून पायावर भार घेणेही मुश्किल झाले होते. सूक्ष्म तपासणीअंती गुडघ्याच्या वाटीची दोरी फाटली असल्याचे निदर्शनास आले, अशा प्रकारची व्याधी खूप दुर्मिळ असते. साधारणतः अशा प्रकारच्या जखमा जगात वर्षाकाठी केवळ दोन ते तीन जणांनाच होतात. तसेच यावर शस्त्रक्रियाही पुणे, मुंबई सारख्या शहरातच होत असतात. नांदूर शिंगोटे येथील रुग्ण उपचारांसाठी कुटे हॉस्पिटलमध्ये आला असता डॉ.सौरभ पगडाल यांनी तपासणी केली. त्यानंतर डॉ.पगडाल यांनी गुडघ्यातील वाटीची दोरी हाडाला परत पूर्वीसारखी दुर्बिणीद्वारे जोडून दिली. यासाठी डॉ.सोनाली कुटे यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. तसेच डॉ.प्रदीप कुटे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. हा रुग्ण आता पूर्वी सारखा चालू शकतो, शेतात काम करू शकतो. अशा प्रकारच्या व्याधीवर शस्त्रक्रिया करणारे निष्णांत शल्यविशारद मोठ्या शहरातही अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहेत. डॉ.सौरभ पगडाल यांनी ऑर्थोस्कोपी सर्जरीचे (दुर्बिणीतून शस्त्रक्रिया) विशेष प्रशिक्षण घेतले असून संगमनेरात ते सेवा देत आहेत. विशेषतः पुणे, मुंबईमध्ये होत असलेल्या कमी अथवा बिनटाक्याच्या दुर्बिणीद्वारे (ऑर्थोस्कोपिक सर्जरी) शस्त्रक्रिया नियमितपणे कुटे हॉस्पिटलमध्ये होत असल्याचे प्रसिद्ध पत्रकातून नमूद केले आहे.