अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाला भीषण आग! सात रुग्ण गंभीररित्या होरपळल्याची माहिती; आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
संपूर्ण देशात दिवाळीचे पर्व उत्साहात साजरे होत असताना अहमदनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून काही वेळातच रुग्णालयाच्या अनेक भागात ती पसरल्याने दाखल असलेल्या जवळपास 25 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत सात रुग्ण गंभीररित्या होरपळल्याचे वृत्त असून त्यातील काहींची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. अहमदनगर अग्निशामन दलाच्या वतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या वृत्ताने दिवाळीच्या उत्साहाला दुःखाची किनार लागली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अहमदनगर शहरातील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तळमजल्यावरील अतिदक्षता विभागात काही कारणाने आग भडकली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सध्या रुग्णालयात कोविड बाधित असलेल्या सुमारे 25 हून अधिक रुग्णांसह अन्य कारणाने आजारी असलेल्या काही रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातच सदरची आग अतिदक्षता विभागात लागल्याने व या विभागात दाखल असलेले बहुतेक रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत असल्याने त्यांना तेथून हलवण्यात मोठी धावपळ उडाली. यादरम्यान सात रुग्ण या आगीत होरपळल्याचे वृत्त आहे. त्यातील पाच जणांची अवस्था चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे.
सदरची आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सुरुवात केली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या बंबांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. रुग्णालयातून धुराचे लोळ आणि त्यासोबतच रुग्णालयात फसलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश बाहेर पसरल्याने परिसरातील वातावरण गंभीर बनले होते. त्यातच बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून अहमदनगर महापालिकेच्या अग्निशामन बंबांकडून सदरची आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने जिल्हाभरात सुरू असलेल्या हर्षोल्हासाच्या दिवाळी पर्वाला दुःखाचे गालबोट लागले आहे.
Visits: 19 Today: 2 Total: 115043