मंदिरे सुरू करण्याबाबत भाजपचे शनिवारी जिल्हाभर घंटानाद आंदोलन

मंदिरे सुरू करण्याबाबत भाजपचे शनिवारी जिल्हाभर घंटानाद आंदोलन
उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांत ठिकठिकाणी आंदोलनाचे आयोजन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असताना महाराष्ट्र राज्यातील मंदिरे मात्र अद्यापही बंद आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता आता राज्यभरातील मंदिरांसमोर “दार उघड उद्धवा दार उघड” असा नारा देत घंटानाद आंदोलन शनिवार दिनांक 29 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 11 वाजता करणार आहे.


या आंदोलनात विविध धार्मिक संस्था व संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबन मुठे यांनी केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले व उत्तर नगर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत असून उत्तर नगर जिल्ह्यातील विविध धार्मिक संस्था, अध्यात्मिक क्षेत्रातील, वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळ, तसेच सर्व धर्मातील धर्मगुरु यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे मुठे यांनी म्हंटले आहे.


याबाबत मुठे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याबाबत अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली आहे. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन सुरू करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही. ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरू करा या मागणीसाठी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत घंटानाद आंदोलन विविध धार्मिक संस्था व संघटना तर्फे शनिवारी सकाळी 11 वाजता उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांत ठिकठिकाणी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या आंदोलनात आपण सहभागी व्हावे असे आवाहन मुठे यांनी केले आहे.

Visits: 151 Today: 1 Total: 1104218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *