प्रवरा नदीच्या परिसरात बिबट्यांचा वावर? सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्या पाठोपाठ आता शहरातही बिबट्यांचे दर्शन घडू लागल्याची जोरदार चर्चा असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवरा परिसरातील संतोषी माता मंदिर, गंगामाई मंदिराच्या पाठीमागील परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचीही चर्चा सुरू असून त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या पिरसरात फिरायला जाणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलून नागरिकांना वास्तवतेचे चित्र दाखवण्याची गरज आहे.

मध्यंतरीच्या काळात शहरालगतच्या घोडेकर मळा परिसरात दिवसा बिबट्याने दर्शन दिल्याचे समोर आले होते. संगमनेर महाविद्यालयाचे प्राध्यापक या रस्त्याने जात असतांना सकाळी सातच्या सुमारास त्यांना बिबट्या आडवा गेला होता. त्यानंतर याबाबतच्या चर्चा जवळपास थांबल्या असे वाटत असताना गेल्या काही दिवसांपासून संतोषी माता व साईबाबा मंदिराच्या परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे काही नागरिकांच्या चर्चेतून समोर आले आहे. याबाबत फारशी स्पष्टता नसली तरीही काही दिवसांपूर्वींच घोडेकर मळा भागात बिबट्या दिसल्याने या चर्चेला पाठबळ मिळत आहे.

संगमनेरचा प्रवरा परिसर झाडी, शेती आणि घरांनी गजबजलेला परिसर आहे. संतोषी माता मंदिर, साईनगर, पंपींग स्टेशन, काशीआई मंदिर, घोडेकर मळा, हिरे मळा अशा वसाहतींमध्ये शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याने या पिरसरात नागरिकांची नेहमीच मोठी रेलचेल दिसून येते. त्यातच या परिसरात शेती आणि त्यातही उसाचे मळे असल्याने बिबट्यांचा वावर असण्याच्या वृत्ताला पाठबळही मिळते. संगमनेर परिसरात मोठ्या संख्येने बिबटे वास्तव्यास आहेत, तालुक्यात काही ठिकाणी या बिबट्यांनी पाळीव जनावरांसह मानवावरही हल्ले केल्याची उदाहरणे आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रवरा परिसरातूनही अशाच पद्धतीच्या चर्चा घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र अद्यापपर्यंत बिबट्याने ना कोणाच्या जनावरांवर हल्ला केला, ना कोणत्याही व्यक्तीवर. त्यामुळे या परिसरात खरोखरी बिबट्या आहे का अशी शंकाही घेण्यास वाव राहतो. वन विभागाने या प्रकरणाची दखल घेवून खरोखरी या भागात बिबट्या असल्यास त्याचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

संगमनेर शहर आणि बिबटे हे सूत्र संगमनेरकरांना नवीन नाही. यापूर्वी इंदिरानगर, संगमनेर नगरपालिके प्रांगण आणि पालिकेच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरात बिबट्यांचा संचार असल्याचे दिसून आले होते. काही वर्षांपूर्वी तर चक्क पालिकेच्या वाचनालयाच्या मागील बाजूस बराचवेळ बिबट्या मुक्कामी होता. तर त्यापूर्वी इंदिरानगर परिसरात तत्कालीन पोलीस निरीक्षक गोंविद पवार यांचा थेट सामना बिबट्याशी झाला होता. आता साईनगर व संतोषी माता मंदिर परिसरात बिबट्याच्या चर्चा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Visits: 93 Today: 2 Total: 1105257

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *