वंचितची भूमिका महाविकास आघाडीसाठी मारक! शिर्डी लोकसभा; उत्कर्षा रुपवतेंसह प्रवीण गवांदे यांचेही नाव चर्चेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जशा समीप येत आहेत तशा राजकीय घडमोडींनाही वेग येवू लागला आहे. राज्यातील बहुतेक लढती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच रंगणार हे निश्चित आहे. मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने वेगळ्या वाटेवरुन जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची भूमिका महाविकास आघाडीसाठी मारक ठरण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात बौद्ध मतांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये पहिली निवडणूक वगळता बौद्ध उमेदवाराला संधी मिळालेली नाही. त्यामुळे स्थानिक बौद्ध नेत्यांकडूनही तशी मागणी पुढे करण्यात आली आहे. त्यातून शिर्डीत तिरंगी लढत होण्याचीही शक्यता निर्माण झाली असून काँग्रेसच्या महिला नेत्या उत्कर्षा रुपवते यांच्या पाठोपाठ आता निवृत्त कृषी अधिकारी प्रवीण गवांदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या परिसीमन प्रक्रियेत पूर्वीच्या कोपरगाव मतदार संघाच्या जागी 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आला. निर्मितीपासूनच या मतदार संघाला अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण लागू असून पुढील पंचवार्षिकपर्यंत ते कायम राहणार आहे. शिर्डीच्या पहिल्या निवडणुकीत विद्यमान केंद्रीयमंत्री व तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून रामदास आठवले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना महायुतीने साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. त्या निवडणुकीत वाकचौरे यांना 3 लाख 59 हजार 921 (54.2 टक्के) तर, रामदास आठवले यांना अवघी 2 लाख 27 हजार 170 (34.2 टक्के) मते मिळाली व त्यांचा तब्बल 1 लाख 32 हजार 751 मतांनी पराभव झाला. ज्येष्ठनेते शरद पवार यांनी त्यावेळी आठवलेंच्या प्रचारसभेतच अॅट्रोसिटीवरुन केलेल्या वक्तव्याचा त्यांना फटका बसल्याचेही त्यावेळी समोर आले होते.

याच निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते अॅड.प्रेमानंद रुपवते यांनीही बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 22 हजार 787 मते (3.4 टक्के) मिळाली होती. 2014 सालच्या निवडणुकीत मात्र मोठे उलटफेर झाले आणि ऐनवेळी शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आघाडीकडून निवडणुकीचे रणांगण गाठले. शेवटच्या क्षणापर्यंत आपण गद्दारी करणार नसल्याचे सांगणार्या वाकचौरेंनी मात्र निवडणुकीच्या तोंडवरच काँग्रेस प्रवेश केल्याने महायुतीला ऐनवेळी उत्तरेला अपरिचित असलेले कर्जत-जामखेडचे आमदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली. मात्र त्यावेळच्या मोदी लाटेने त्यांना तारले आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा तब्बल 1 लाख 99 हजार 922 मतांनी दारुण पराभव झाला. या निवडणुकीत महायुतीच्या मतांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर आघाडीची मते दीड टक्क्याने घटली.

2014 साली काँग्रेसमध्ये गेलेल्या वाकचौरे यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करताना श्रीरामपूर विधानसभाही लढवली. मात्र ते अपयशी ठरले. 2019 येतायेता त्यांना पक्षच न राहिल्याने अखेर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत लोकसभा निवडूक लढवली. मात्र अवघ्या 35 हजार 526 मतांसह (3.5 टक्के) ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. तर वंचित बहुजन आघाडीच्या संजय सुखदान यांनी 63 हजार 287 मते (6.1 टक्के) मिळवतांना शिर्डी लोकसभा मतदार संघातील बौद्ध मतांची ताकदही अधोरेखीत केली. त्यावेळी महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना 4 लाख 86 हजार 820 (47.3 टक्के) तर, आघाडीच्या भाऊसाहेब कांबळे यांना 3 लाख 66 हजार 625 (35.6 टक्के) मते मिळाली. या निवडणुकीत विरोधी गटाच्या मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कायम राहिली. मात्र महायुतीच्या टक्केवारीत तब्बल 10 टक्क्यांची घट नोंदविली गेली.

शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या चौथ्या निवडणुकीचे चित्र अद्यापही काहीसे धुसर आहे. महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. तर, नकारात्मक सर्व्हे अहवाल, मतदारांमधील नाराजी आणि बौद्ध उमेदवाराची मागणी या पार्श्वभूमीवर वेगवेगळे अंदाज फोल ठरवताना विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी पहिल्याच यादीत आपले नाव जाहीर करुन घेण्याची किमया साधली आहे. मात्र असे असले तरीही त्यांच्या जागेवर दुसराच उमेदवार निश्चित होणार असल्याच्या चर्चा आजही सुरुच असल्याचेही चित्र आहे.

नव्या चेहर्यांना संधी मिळावी अशी रास्त मागणी घेवून गेली दोन दशके काँग्रेसच्या विचारधारेवर काम करणार्या अकोल्याच्या उत्कर्षा रुपवते वाकचौरेंच्या उमेदवारीवर नाराज असून त्यांनी त्यावर उघड भाष्य करताना वेगळी वाट निवडण्याचे संकेतही दिले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील राजगृहावर जावून वंचितचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतल्याने त्यांना वंचितकडून शिर्डीची उमेदवारी जाहीर होईल अशा शक्यताही निर्माण झाल्या आहेत. मात्र रुपवतेंची उमेदवारी उत्तरेतील काँग्रेसच्या काही नेत्यांना अडचणीची ठरण्याचीही शक्यता आहे. अशातच मूळ कळसचे (ता.अकोले) असलेल्या निवृत्त कृषी अधिकारी प्रवीण गवांदे यांचेही नाव आता समोर आले आहे. या दोघातील एकाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास उत्तरेतील बौद्ध समाजासह स्थानिक पातळीवरील मतांचे विभाजन होवून त्याचा थेट फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अॅड.प्रकाश आंबेडकर शिर्डीबाबत काय निर्णय घेतात यावरच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असल्याचे आता बोलले जावू लागले आहे.

शिर्डी लोकसभेत 2009 साली महायुतीच्या उमेदवाराला 54.2 टक्के तर आघाडीला 34.2 टक्के मतं मिळाली होती. 2014 साली देशात पुरोगामी लोकशाही आघाडी विरोधात नकारात्मक मत तयार होवून नरेंद्र मोदी यांची लाट निर्माण झाली होती. त्याचा फायदा शिर्डीतील मतदानातही दिसून आला व महायुतीच्या एकूण मतांमध्ये 2.9 टक्क्यांची वाढ झाली. मात्र त्याचवेळी आघाडीच्या मतांमध्येही 1.5 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचा करिष्मा होता. मात्र त्यावेळी महायुतीच्या उमेदवाराची टक्केवारी तब्बल 9.8 टक्क्यांनी घसरुन ती 47.3 टक्के झाली. तर, आघाडीची टक्केवारी स्थिर राहीली. त्या निवडणुकीत वंचित, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर छोट्या पक्षांसह अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना पडलेल्या मतांनी लोखंडेंचे मताधिक्य वाढवले. त्यामुळे यंदा वंचित पुन्हा मैदानात उतरल्यास शिर्डीच्या निकालात बदल होण्याची आशा धुसर होण्याचीच दाट शक्यता आहे.

