संगमनेरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप अखेर निलंबित! आमदार अमोल खताळ यांच्याशी ‘पंगा’ भोवला; भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराला चाप..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकीय वरदहस्ताचा कवचपेहराव ओढून शासकीय नियमांना पायदळी तुडवणारे संगमनेरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या नऊ वर्षांच्या मनमानी कारभाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्तव्यात कसूर, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि प्रशासकीय शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, नूतन आमदार अमोल खताळ यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून त्यांच्याशी घेतलेला ‘पंगा’ डॉ.घोलप यांच्या अंगलट आल्याची जोरदार चर्चा आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.


डॉ.सुरेश विश्‍वनाथ घोलप हे 2016 पासून संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकारी पदावर ठाण मांडून होते. शासकीय नियमानुसार दर तीन वर्षांनी बदली होणे अनिवार्य असताना, त्यांनी आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून तब्बल नऊ वर्षे एकाच खुर्चीवर घालवली. 2019 च्या बदली सत्रात ‘कोविड’चे कारण पुढे आले, मात्र त्यानंतरच्या काळातही त्यांनी आपली जागा ढळू दिली नाही. या प्रदीर्घ कार्यकाळात संगमनेरच्या आरोग्य विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. सामान्य कर्मचारी आणि महिला सहकार्‍यांनीही त्यांच्याविरोधात गंभीर तक्रारी केल्या होत्या. माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणजे, संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत असताना, या महोदयांनी शासकीय पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या पत्नीच्या नावे ‘कोविड सेंटर’ सुरु करुन वैद्यकीय व्यवसायाचा बाजार मांडला होता.


संगमनेरमध्ये झालेल्या सत्तांतरानंतरही डॉ.घोलप यांची वर्तणूक बदलली नव्हती. नुकत्याच पंचायत समितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांच्या उद्धटपणाचा कळस पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या बैठकीला वेळेवर उपस्थित न राहणे आणि शासकीय प्रोटोकॉल डावलून ‘जीन्स-टीशर्ट’ अशा अनौपचारिक पेहरावात येऊन आमदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, त्यांना महागात पडले. आमदार अमोल खताळ यांनी त्याचवेळी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाल्याचे संकेत दिले होते.


सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये यांनी बुधवारी (दि.11) रात्री उशिरा डॉ.घोलप यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. निलंबनाच्या काळात त्यांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यांना पालघर जिल्हा रुग्णालयात आपली उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून व्हेंटिलेटरवर गेलेल्या संगमनेरच्या आरोग्य विभागाला या निर्णयामुळे अखेर ‘ऑक्सिजन’ मिळाल्याची भावना तालुक्यातील आरोग्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. एका भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍याची उचलबांगडी झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.


शासनाच्या आरोग्य विभागाने संगमनेरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश विश्‍वनाथ घोलप यांचे निलंबन करुन त्यांना तात्काळ पालघर मुख्यालयात हजर होण्याचे फर्मान धाडले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी आज (ता.12) माध्यान्नाच्या सुमारास त्यांना कार्यमुक्त केले असून त्यांचा अतिरीक्त कार्यभार तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश रावसाहेब माने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Visits: 12 Today: 13 Total: 1452454

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *