प्रदेशाध्यक्ष थोरात यांचा वाढदिवस होणार ‘काँग्रेस बळकटीकरण सप्ताह’! भाजप व राष्ट्रवादीच्या पक्षविस्तार कार्यक्रमाला शह देण्यासाठी काँग्रेसची मोहीम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 ते 7 फेब्रुवारी या काळात काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये जनसंपर्कासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या प्रयोगातून काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासोबतच प्रदेशाध्यक्ष म्हणून थोरात यांच्या नेतृत्वालाही बळकटी देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या काँग्रेसची सरकारमध्ये उपेक्षा झाल्याचे आरोप अनेकदा झाले. खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनीही यासंबंधी तक्रारी केल्या होत्या. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पक्षाच्या भावना कळविताना काही सूचनाही केल्या होत्या. काँग्रेसमध्ये सध्या केंद्रीय तसेच प्रादेशिक नेतृत्वाच्या बदलाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये गुर्‍हाळात काँग्रेस पक्ष अडकलेला असताना विरोधातील भाजप आणि सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्षविस्तारासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. राज्यातील काहींचे या दोन्ही पक्षांमध्ये पक्षप्रवेशही झाले. तुलनेत काँग्रेसमधील हालचाली थंडच राहील्या. आता मात्र, काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस बळकटीकरणासाठी उपक्रमही सुरू करण्यात येत आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे येत्या 1 ते 7 फेब्रुवारी हा कालावधी काँग्रेस बळकटीकरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या काळात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपक्रम, आरोग्य शिबिरे, वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम, गावागावांत नव्या शाखा उघडणे असे कार्यक्रम होणार आहेत. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कामाला सुरवात करण्यात आली आहे. डॉ.तांबे यांच्यासह आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, ज्ञानदेव वाफारे, मधुकर नवले, सुरेश थोरात, दादापाटील वाकचौरे, इंद्रभान थोरात, हिरालाल पगडाल, डॉ.एकनाथ गोंदकर यांच्यासह नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यासाठी पुढाकार घेत आहेत. या कालावधीमध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषद गट व गणनिहाय विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, भाषण स्पर्धा, नोकरी मेळावा, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. गाव तेथे सक्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची शाखा, युवक काँग्रेसच्या विविध शाखांची स्थापनाही होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विविध निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे, महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवतांना केलेली लोकोपयोगी कामे लोकांना सांगणे असे उपक्रम याद्वारे होणार आहेत.


काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर अगदी तळागाळापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस पक्षाचे विचार आणि राज्य सरकारकडून राबविण्यात आलेले विविध धोरणात्मक निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून पक्ष विस्ताराच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात काँग्रेसच्या शाखा उघडण्यासोबतच युवा पिढीला युवक काँग्रेसशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
– डॉ.सुधीर तांबे
सदस्य-विधान परिषद

Visits: 91 Today: 2 Total: 1103600

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *