तीन चाकांची रिक्षा चालवणं खरंच अवघड काम आहे!

तीन चाकांची रिक्षा चालवणं खरंच अवघड काम आहे!
खासदार विखेंची रिक्षा चालवून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी बुधवारी (ता.19) श्रीरामपूरमध्ये तीनचाकी रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला. रिक्षा चालवल्यानंतर आलेला अनुभव सांगताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तिरकस शब्दांत जोरदार टीका केली.


श्रीरामपूर येथे मुळा-प्रवरा वीज संस्थेच्यावतीने 30 हजार सभासदांकरिता अवघ्या पाचशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा उपक्रम शहरात घेण्यात आला, त्याच्या उद्घाटनासाठी खासदार विखे आले होते. त्याचवेळी एक रिक्षाचालक आपली नवीन रिक्षा खासदारांच्या भेटीला घेऊन आला. त्यावेळी सॅनिटायझरच्या एका उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी ही रिक्षा चालविली. माजी सभापती दीपक नवले व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांना या रिक्षात बसविले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी रिक्षा चालवण्याचा अनुभव सांगितला. ‘तीन चाकांची रिक्षा चालवणं खरंच अवघड काम आहे. पाच मिनिटेच मी रिक्षा चालवली. पण गाडी तीन चाकी असल्यानं अनेकदा वेग कमी करावा लागला. मागे बसलेले लोकही घाबरत होते. पाच मिनिटं तीन चाकांची गाडी चालवताना एवढी काळजी घ्यावी लागते, तर पाच वर्षे सरकार कसं चालणार हा मोठा प्रश्नच आहे. हे तीनचाकी सरकार किती दिवस चालेल माहीत नाही. त्यात असलेले लोक किती घाबरलेले आहेत हेही माहीत नाही,’ असा टोला विखेंनी मारला.


रिक्षाप्रमाणेच तीन पक्षांचे सरकार चालविणेही अवघडच आहे. त्यामुळेच लोकांचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ज्यांना कुणाला हे सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी रिक्षा चालवून पहावी. स्वत: अनुभव घ्यावा. माझी खात्री झाली आहे की हे सरकार जनतेसाठी काहीच करू शकत नाही. कोरोनाशी लढण्यात, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारकडून अपेक्षा करणेही व्यर्थ आहे, अशी तिरकस शब्दांत जोरदार टीका केली.

Visits: 14 Today: 1 Total: 116633

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *