‘यशोधन’ बनले काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीचे केंद्र! अंतर्गत सर्व्हेक्षणात काँग्रेसची बाजी; इच्छुकांची समर्थकांसह संगमनेरात गर्दी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधीक जागा पटकावल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातही आघाडीत काँगे्रसलाच सर्वाधीक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडीच्या शीर्षस्थानी आली असून जागा वाटपातही त्याचे प्रतिबिंब दिसण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीमध्ये फेरनिवड होण्यासह त्यांना पहिल्या पंधरा सदस्यांमध्ये स्थान मिळाल्याने दिल्लीत संगमनेरचे ‘वजन’ही वाढले आहे. त्याचा परिणाम राज्यातील विविध विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांनी मुंबईला टाळून आपल्या समर्थकांसह संगमनेरातच गर्दी करायला सुरुवात केल्याने थोरातांचे यशोधन कार्यालय काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीचे केंद्र बनले आहे.
दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकपूर्व सर्व्हेतून राज्यात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व राहील असे अंदाज सर्वच सर्व्हेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केले होते. प्रत्यक्षात निकालानंतर मात्र राज्यातील महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपची धूळधाण उडवल्याचे समोर आले. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश आणि अन्य काही राज्यांमधूनही अशाच प्रकारचे निकाल समोर आल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला. देशावर सात दशकं राज्य करणार्या काँग्रेसला तब्बल दहा वर्षांनंतर शंभरीजवळ नेणारे यश मिळाल्याने दशकानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता लाभला. राज्यातही महाविकास आघाडीने मिळवलेल्या 30 जागांमधील सर्वाधीक 13 जागांवर काँग्रेसला यश मिळाले. त्यामुळे राज्यातील आघाडीत काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याचे त्यावेळीच स्पष्ट झाले होते.
येत्या 26 नोव्हेंबर रोजी राज्य विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रचारासाठी आवश्यक वेळ मिळावा, अंतर्गत मतभेदांचे समाधान होवून एकविचाराने निवडणूक लढवता यावी या विचारातून महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूच्या घटक पक्षांकडून जागा वाटपाच्या अनुषंगाने अंतर्गत सर्व्हेक्षणाचा आधार घेत वाटाघाटीत जागांवर दावे ठोकण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यातील 155 विधानसभा मतदार संघातून आघाडी मिळाली होती. त्यातही काँग्रेसने घवघवीत यश मिळवताना 13 जागांवर विजय मिळवला तर सात जागांवर त्यांचे उमेदवार दुसर्या क्रमांकावर होते.
आघाडीने एकीची वज्रमूठ आवळून भाजप आणि मोदींचा मुकाबला करीत राज्यात भक्कम पाय रोवल्याने काँग्रेससह उद्धव उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनेही विजयाचे श्रेय घेत विधानसभेत आपणच मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे बिंबवण्यास सुरुवात केली. उबाठासेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर थेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असल्याचे सांगत कहरच केला. त्यामुळे काँग्रेसलाही ज्यांच्या जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री अशा सूत्राची घोषणा करावी लागली. काँग्रेसला लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही यश मिळण्याची आशा आहे. उबाठाच्या भूमिकेने आपला दावा सैल होवू नये यासाठी काँग्रेसने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघात सर्व्हेक्षण केले.
त्यातून काँग्रेसला 80, शरद पवार यांच्या पक्षाला 60 ते 65 आणि ठाकरे यांच्या सेनेला 35 ते 40 अशा महाविकास आघाडीला 175 ते 180 जागा मिळतील असे निष्कर्ष काढण्यात आले. या सर्व्हेक्षणातही काँग्रेसच आघाडीत आघाडीवर असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा फैसला दिल्ली दरबारीच होईल असे सांगत एकप्रकारे राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्त्यूत्तरच दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही स्वतंत्रपणे सर्व्हे करवून घेतला. त्याचे परिणाम त्यांनाच अनुकूल ठरतील अशाप्रकारे समोर आले. ठाकरेंच्या सर्व्हेक्षण कंपनीने काढलेल्या निष्कर्षात ठाकरे सेनेला 70, काँग्रेसला 60 तर, शरद पवारांना 50 ते 55 अशा 180 जागांचे अंदाज समोर आले. मात्र त्यानंतरही उबाठाच्या भाषेत आलेला मवाळपणा पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसचाच वरचष्मा असणार हे निश्चित आहे.
एकीकडे काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून उत्साहवर्धक निष्कर्ष समोर आलेले असताना दुसरीकडे राज्यात भाजप-सेना युतीला बहुमत मिळालेले असतानाही उद्धव ठाकरे यांना सोबत घेत आकाराला आलेल्या महाविकास आघाडीच्या रचनेतील शिल्पकार माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रीय कार्यकारणीत फेरनिवड करण्यासह त्यांना देशातील पहिल्या फळीतल्या 15 नेत्यांमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे ‘दिल्लीत’ संगमनेरचे ‘वजन’ही शतपटीने वाढले आहे. काँग्रेसच्या सर्व्हेक्षणानुसार प्रत्यक्षात तसेच घडल्यास थोरातच राज्याचे मुख्यमंत्री होतील या चर्चेलाही या निवड प्रक्रियेने बळ दिले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा ‘की-पर्सन’ म्हणून होवू लागली असून आगामी निवडणुकीत इच्छुक असलेले अनेक उमेदवार मुंबई अथवा नागपूरला जावून तिकिटं मागण्याचे टाळून संगमनेरात आपल्या समर्थकांसह हजेरी लावीत आहेत.
गेल्या दोन दिवसांत हिरामण खोसकर, लकी जाधव, बबनराव देशमुख, दादासाहेब मुंढे, प्राध्यापक श्रीमती मोराळे अशा कितीतरी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह संगमनेरात येत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून त्या-त्या ठिकाणच्या जागांवर दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे थोरात यांचे संगमनेरातील ‘यशोधन’ कार्यालय सध्या राज्यातील काँग्रेसच्या निवडणुकीचे ‘केंद्र’च ठरु लागले आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 1985 सालची निवडणूक जिंकून विधीमंडळात प्रवेश केला होता. त्यानंतर आजवरच्या आठही निवडणुकांमध्ये त्यांच्या विजयी मतांचा आकडा चढत्याक्रमाने राहीला आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या थोरातांनी 1999 ते 2014 आणि 2019 ते 2022 अशी एकूण साडेसतरा वर्ष विविध मंत्रीपदेही भूषविले आहेत. गेल्या दहावर्षात काँग्रेसमध्ये मोठी पडझड होवूनही त्यांनी न डगमगता मोदी लाटेतही काँग्रेसची नाव तरंगत ठेवली. पक्षाला आज मिळालेल्या यशातही त्यांचा बहुमोल वाटा आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या पंधरा सदस्यांमध्ये स्थान देवून एकप्रकारे राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराच न बोलता जाहीर केला असावा अशी जोरदार चर्चा असून त्यामुळेच राज्यातील इच्छुक मुंबई सोडून संगमनेरात गर्दी करीत आहेत.